*मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला महत्वपूर्ण निर्णय*
*• "एल" सत्ताप्रकारातील शासकीय जमिनी आता "ए" सत्ताप्रकारात;*
*• खरेदीखतधारकांना नोंदणी व्यवहारास मोकळीक*
सांगली दि. 11 जुलै
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका हद्दीतील सांगली शहरातील जमिनीसंदर्भात महत्वपूर्ण निर्णय आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार, सांगली संस्थानाच्या सी.एस. नं. १ मधील एकूण ६४ मिळकतींचे सत्ताप्रकार “एल” वरून “ए” मध्ये विनामूल्य रुपांतरण करण्यात येणार आहे.
सदर मिळकती सन १९२८ मध्ये तयार झाल्या असून त्या शासन अभिलेखांमध्ये "एल" सत्ताप्रकार अर्थात शासकीय जागा, इमारती म्हणून नोंदविल्या गेल्या होत्या. त्यामुळे या मिळकती नियंत्रित सत्ताप्रकारात गणल्या जात होत्या आणि त्यामुळे खरेदी-विक्री, वापरात बदल यांसारख्या व्यवहारांवर निर्बंध लागू होत होते.
मात्र, या मिळकती संबंधित धारकांनी रितसर खरेदीखतांद्वारे विकत घेतलेल्या असल्यामुळे त्यांना नियामक सत्ताप्रकारातून मुक्त करणे आवश्यक होते. याअनुषंगाने, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ चे कलम २०(१) व २९ अन्वये, या मिळकतींचे "एल" सत्ताप्रकारातून विनामूल्य "ए" सत्ताप्रकारात रुपांतर करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने आज घेतला.
या सत्ता बदल प्रकारासाठी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी गेली 5 वर्षे पाठपुरावा केला होता त्यांनी मागील महसूलमंत्री राधाकृष्ण विखेपाटील व विद्यमान महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमवेत वेळीवेळी मंत्रालयात जिल्हा प्रशासनच्या बैठकी लावून त्यावर कायम स्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले होते.
या निर्णयामुळे सांगली शहरातील शेकडो नागरिकांना दिलासा मिळणार असून त्यांच्या मालकीच्या जमिनीवरील व्यवहारांना कायदेशीर स्थैर्य मिळेल. या निर्णयामुळे सांगली परिसरातील स्थावर मालमत्तेच्या व्यवहारांना चालना मिळणार असून नागरी विकासाच्या दृष्टीनेही ही एक महत्त्वपूर्ण पायरी ठरणार आहे.
यावेळी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे “एल“ सत्ताप्रकारातील शासकीय जमिनी आता "ए" सत्ताप्रकारात बदलाचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या महत्वपूर्ण निर्णय बद्दल विधानभवन येथे पुष्पगुछ देऊन आभार मानले.