नांदेड : ई-पिक पाहणी तसेच सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेत प्रती शेतकरी 2 हेक्टरच्या मर्यादेत कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 5 हजार रुपये प्रति हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामध्ये ईपीक पाहणी पोर्टलवर नोंद नसणाऱ्या शेतकऱ्यांनी तातडीने कृषी विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
ज्यांना पैसे मिळाले नाही. त्यांनी अपूर्ण माहिती पूर्ण करावी.
ई-पिक पाहणी नोंदीनुसार शेतकरी खातेदार यांच्या याद्या कृषि विभागाने गावनिहाय ठळक ठिकाणी प्रदर्शित केल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर कापूस /सोयाबिन पिकाची नोंद आहे मात्र ई-पिक पाहणी मध्ये त्यांचे नाव आले नाही अशा तक्रारी काही ठिकाणाहून प्राप्त झाल्या आहेत. कापूस व सोयाबिन पीक उत्पादक शेतकरी मदतीपासून वंचित राहू नयेत यासाठी खरीप हंगाम 2023 च्या सातबारा उताऱ्यावर नोंद असून ई-पिक पाहणी पोर्टलवर नोंद नसलेले खातेदारानी आपले नाव, गाव, तालुका, जिल्हा, गट क्रमांक, एकूण सोयाबिन पिकाखालील क्षेत्र हेक्टर आर, एकूण कापूस पिकाखालील क्षेत्र हे. आर ईत्यादी माहिती तक्त्यात, नमुन्यात भरुन सहीनिशी माहिती संबंधित गावचे कृषी सहाय्यक यांच्याकडे सादर करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. वनपट्टेधारकांनाही मिळणार मदत
राज्यात आदिवासी शेतकऱ्यांना वनपट्टे वितरीत करण्यात आलेले आहेत. अशा वनपट्टे धारकांपैकी ज्या वनपट्टयावर खरीप 2023 हंगामात कापूस किंवा सोयाबिन अथवा दोन्ही पिकांची लागवड केली होती याबाबतची माहिती गावनिहाय वनपट्टा क्रमांक, वनपट्टा धारक पूर्ण नाव, कापूस व सोयाबिन पिकाखाली असलेले क्षेत्र याची माहिती तक्त्यात संकलित करुन कृषी विभागास सादर करावी, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.