तुम्हीच सांगा आता.... पडावं की बुडावं....!!!

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 23/07/2024 4:03 PM

सध्या हरिपूर रस्ता काम चालले आहे त्यावर स्थानिक नागरिकांनी आपल्या भावना कवितेतून व्यक्त केलेल्या आहेत....


पडावं की बुडावं?

पडावं की बुडावं हा एकच सवाल आहे,
या हरिपूरच्या विक्राळ घसरवाटेवर.

निसरड्या चिखलावरून घसरून पडावं वाहनासहित
आणि लोळत पडावं डुकरासारखं निर्लज्ज आनंदाने-
या काठोकाठ भरलेल्या सपंक खड्ड्यांमध्ये,

की फेकून द्यावं हे बुळचट मनाचं आणि सोशिक नागरिकत्वाचं लक्तर
शेजारी उंचावून उभारलेल्या रस्त्याच्या सिमेंटी कबरीवर ?

की पहात रहावं शेजारून फूत्कारत वाहात असलेल्या कृष्णेच्या
'पुरोत्सुक' प्रवाहाकडे आशेनं,

की हीच येईल आणि बुडवून टाकेल 
आमच्यासह,
आमच्या सहनशीलतेचा हा पुरावा ?

आणि मग पुढल्या निवडणुकीपर्यंत जावे हरीपूरने
एका प्रगाढ निद्रेत.

स्वप्नातच पहावेत 
सिमेंटी विकासमार्गावरून येणारे श्रद्धाळूंचे लोंढे,
गावाचं अर्थचक्र फिरवणारी जत्रा,
जी येऊन उभी राहिलीय अवघ्या पंधरवड्यावर..

किंवा त्या निद्रेतच करावा शेवट आमच्या स्वप्नांचा,
आणि धरावी इच्छा-पूरग्रस्त होऊन- 
येणाऱ्या मदतीच्या ओघात 
स्वाभिमान वाहून जाण्याची?

कोडगेपणाच्या महासर्पाने आमच्या जाणिवांना असा डंख मारावा
की पडणाऱ्या लेकुरवाळ्या दुचाक्या, 
अधांतरी लटकलेल्या चारचाक्या,
जीव मुठीत धरून जाणाऱ्या ज्येष्ठप्रवासिनी.. 
अगदी स्वतःचेही त्रागे पोचू नयेत 
आमच्या मेंदूपर्यंत.

भाबडेपणाने आम्ही विश्वास ठेवतो 
'कॉन्क्रीट' आश्वासनांवर.
आठवत राहतो हताशपणे-
ते ऐन मार्चातले साक्षात्कार!

साजरी करत राहतो आमच्या प्रवासाची विटंबना
आणि अखेर अपेक्षांचा कटोरा घेऊन
उभे राहतो हताश मनाने, 
पुन्हा त्याच 
उद्धारकर्त्यांच्या दाराशी.

हे गजानना,तू इतका कठोर का झालास ?

एका बाजूला आम्ही ज्यांना प्रेम देतो
ते ही अवहेलना पाहायला यायचं विसरतात,
आणि या मृत्युमार्गावर 
जीव धोक्यात घालून
जाता येता आम्ही ज्या तुझ्यासमोर नतमस्तक होतो
तो तूही आम्हाला विसरतोस.

मग हे खड्ड्यांमुळे खुळखुळणारे हाडांचे सापळे
घेऊन
हे विघ्नहर्त्या,

आम्हा पापी ग्रामस्थांनी
कुणाच्या पायावर डोकं आदळायचं ?

कुणाच्या ?

कुसुमाग्रजचरणी - विनीता तेलंग

Share

Other News

ताज्या बातम्या