सामाजिक संस्थानी मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी सहयोग द्यावे : जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 24/04/2024 10:10 AM


 
 सांगली, दि. २३,
जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ७ मे २०२४ रोजी मतदान होत आहे. मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपक्रम राबवत असून जिल्ह्यातील सामाजिक संस्थांनीही या उपक्रमात सहभागी होऊन जिल्ह्यात लोकसभेसाठी अधिकाधिक मतदान व्हावे यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले.
 लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सामाजिक संस्थांचे योगदान मिळावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समितीच्या सभागृहात सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महापालिका आयुक्त शुभम गुप्ता, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, सहाय्यक जिल्हाधिकारी अमित रंजन, स्वीपचे नोडल अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे उपस्थित होते.
 जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी लोकशाहीचा उत्सव सुरू आहे. या उत्सवात  जिल्ह्यातील मतदारांनी आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावून मतदान टक्केवारी वाढविण्यामध्ये आपले योगदान द्यावे.  जिल्ह्यातील मतदान केंद्रावर मतदारांसाठी आवश्यक सुविधा देण्यात येणार आहेत. यामध्ये पिण्याचे पाणी, सावली, वेटींग रुम, टोकन पद्धत, दिव्यांग मतदारासाठी मदतनीस वाहतुकीची सोय अशा सुविधांचा समावेश आहे. 
 मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती धोडमिसे म्हणाल्या, सामाजिक संस्थांची नाळ तळागाळातील लोकांपर्यंत जोडलेली असते. त्यांनी मतदारांना लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी प्रेरित करावे व जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी योगदान द्यावे. तर पोलीस अधीक्षक श्री. घुगे म्हणाले मतदारांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करण्यास पुढे यावे. लोकशाहीच्या उत्सवात आपला सहभाग नोंदवून मतदानाची टक्केवारी वाढविण्यात आपला सहभाग नोंदवावा. 
 सामाजिक संस्थेच्या प्रतिनिधींनी यावेळी जिल्हा प्रशासनाचे कौतुक करून काही मौलिक सूचनाही केल्या.

Share

Other News

ताज्या बातम्या