नांदेड : महाराष्ट्र शासन व आशियाई विकास बँकेच्या अर्थसहाय्याने राज्यात राबविण्यात येत असलेल्या महाराष्ट्र अॅग्री बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पांतर्गत विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी लातूर, बीड, धाराशिव व नांदेड जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी सहकारी संस्था, कृषी विज्ञान केंद्रे तसेच कृषी विद्यापीठांनी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, लातूर यांच्यावतीने करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, शेतमालाचे मूल्यवर्धन करणे, काढणीनंतरचे नुकसान कमी करणे, शेतमालाची उत्पादकता वाढविणे तसेच ग्रामीण भागातील महिलांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करून त्यांचे सक्षमीकरण करणे, ही मॅग्नेट प्रकल्पाची प्रमुख उद्दिष्टे आहेत.
या प्रकल्पांतर्गत सीताफळ, पेरू, केळी, स्ट्रॉबेरी, संत्री, डाळिंब, चिकू, मोसंबी, मिरची (हिरवी व लाल), भेंडी, आंबा, काजू, लिंबू, पडवळ आणि फुलपिके यांचा समावेश असून, या पिकांच्या मूल्यसाखळी विकसित करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
*विविध घटकांसाठी 60 टक्क्यांपर्यंत अनुदान*
मॅग्नेट प्रकल्पातील घटक क्र. 1 अंतर्गत ‘बाजाराभिमुख उत्पादन वाढविणे आणि उत्पादकता सुधारणे’ या उपघटकात ग्लोबलगॅप प्रमाणिकरण, उर्वरित कीटकनाशक अंश तपासणी, केळी पिकासाठी फळ देखभाल पद्धती तसेच सेंद्रिय प्रमाणिकरणासाठी पात्र खर्चाच्या 60 टक्क्यांपर्यंत अनुदान उपलब्ध आहे.
फळ देखभाल व्यवस्थापन (केळी) : निवडलेल्या प्रत्येक शेतकऱ्यास पात्र खर्चाच्या 60 टक्के किंवा कमाल 24 हजार रुपये, यापैकी जे कमी असेल तेवढे अनुदान देय आहे. अर्जदारासाठी पात्र खर्चाच्या 60 टक्के किंवा कमाल 6 लाख रुपये, यापैकी कमी रक्कम अनुदान म्हणून देण्यात येईल.
गॅप प्रमाणिकरण : पात्र पिकांसाठी प्रत्येक मंजूर प्रस्तावास पात्र खर्चाच्या 60 टक्के किंवा कमाल 2 लाख 10 हजार रुपये (50 शेतकऱ्यांच्या प्रस्तावासाठी), यापैकी जे कमी असेल तेवढे अनुदान देय आहे.
उर्वरित कीटकनाशक अंश तपासणी : प्रत्येक मंजूर प्रस्तावासाठी पात्र खर्चाच्या 60 टक्के किंवा कमाल 5 लाख रुपये (50 शेतकऱ्यांच्या प्रस्तावासाठी), यापैकी कमी रक्कम अनुदान म्हणून देण्यात येईल.
सेंद्रिय प्रमाणिकरण : प्रत्येक मंजूर प्रस्तावासाठी पात्र खर्चाच्या 60 टक्के किंवा कमाल 1 लाख 80 हजार रुपये (40 शेतकऱ्यांच्या प्रस्तावासाठी), यापैकी जे कमी असेल तेवढे अनुदान तीन वर्षांसाठी देण्यात येईल.
या योजनांचा जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा आणि संबंधित संस्थांनी आवश्यक प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन मॅग्नेट प्रकल्प, प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, लातूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प, प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, लातूर, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, विभागीय कार्यालय, लातूर, आंबा व डाळिंब निर्यात सुविधा केंद्र, प्लॉट क्र. डी-1/1, नवीन एमआयडीसी, वखार महामंडळाच्या गोदामासमोर, बार्शी रोड, लातूर येथील गणेश पाटील, विभागीय प्रकल्प अधिकारी (मो. 9518768712), पृथ्वीराज मनके, अॅग्री बिझनेस एक्सपर्ट (मो. 959594949331) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.