नांदेड : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०च्या मार्गदर्शक सूचनांनुसार अंगणवाडी केंद्रे नजीकच्या शाळांमध्ये स्थलांतरित करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस नांदेड महानगरपालिका तसेच जिल्हा परिषद शिक्षण विभागांतर्गत प्राथमिक व माध्यमिक शाळांचे सुमारे २५० मुख्याध्यापक उपस्थित होते.
बालविकास प्रकल्प कार्यालय, नागरी प्रकल्प, नांदेड शहर यांच्या वतीने आयोजित या बैठकीत अंगणवाडी केंद्रांचे शाळांमध्ये सहस्थलीकरण करण्याबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचना व कार्यपद्धतीची माहिती देण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी उपस्थित मुख्याध्यापकांशी संवाद साधून शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या रिक्त वर्गखोल्या अंगणवाडी केंद्रांसाठी उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले.
या आवाहनास प्रतिसाद देत ६५ शाळांच्या मुख्याध्यापकांनी अंगणवाडी केंद्रांसाठी वर्गखोली उपलब्ध करून देण्यास सहमती दर्शविली. यामुळे अंगणवाडीतील बालकांना शाळेच्या शैक्षणिक वातावरणाचा लाभ मिळण्यास मदत होणार असून, पूर्वप्राथमिक शिक्षण अधिक परिणामकारक करण्यास चालना मिळणार आहे.
बैठकीची प्रस्तावना बालविकास प्रकल्प अधिकारी कैलास तिडके यांनी केली. यावेळी जिल्हा समुपदेशक तथा विस्तार अधिकारी बालासाहेब कच्छवे, उपशिक्षणाधिकारी प्राथमिक प्रविणा मंदाने, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक प्रज्ञा भवरे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.