नांदेड : मंजुर विकास आराखड्यातील रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या इदगाह कमान ते बोंढार बायपासकडे जाणारा रस्ता अतिक्रमणमुक्त करण्यासाठी नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने दि.०३ ऑगस्ट २०२६ रोजी एक मोठी आणि धडक मोहीम हाती घेण्यात आली. *मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे आणि पोलीस अधिक्षक डॉ.निलभ रोहन* यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली, शहरातील मुख्य मार्ग असलेल्या इदगाह कमान रोड ते बोंढार बायपास रोडवरील अनेक वर्षांचे पक्के व कच्चे अतिक्रमण मनपाच्या पथकाने जे.सी.बी.च्या साहाय्याने पूर्णपणे जमीनदोस्त केले आहे.
इदगाह कमान ते बोंढार बायपास हा मंजुर विकास आराखड्यानुसार ६० फुटाचा रस्ता करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत करण्यात येत होते. परंतु येथील अतिक्रमणामुळे मागील दोन वर्षापासुन सदरील रस्त्याचे काम प्रलंबित होते. रस्ता रुंदीकरणाच्या जागेत स्थानिक नागरिकांनी आपली घरे ३३ फुटा पर्यंत रस्त्यावर अतिक्रमण करत मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर ताबा मिळवला होता. यामुळे या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामात अडथळा निर्माण होत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने महापालिकेस केलेल्या पत्रव्यवहारानुसार आज मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने या संपूर्ण मार्गावरील १० ते १५ घरांची पक्की बांधकामे, अनधिकृत शेड्स, आणि दुकानांचे वाढीव भाग हटवून अतिक्रमित भाग पूर्णपणे मोकळा केला आहे.
केवळ बायपास रस्ताच नव्हे, तर नांदेड वाघाळा मनपा हद्दीतील इतरही प्रमुख भागांत ही धडक मोहीम राबवण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने वजिराबाद भागातील तिरंगा चौकातील रस्ते आणि पदपथांवर अनधिकृतपणे थाटलेली दुकाने व व्यावसायिक अडथळे हटवण्यात आले. तसेच जुन्या नांदेड भागातील मॅफको रोड येथे सुध्दा कारवाई करण्यात आली.
या कारवाईदरम्यान कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. काही ठिकाणी अतिक्रमणधारकांनी प्रशासकीय कामात अडथळा आणण्याचा किंवा हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. सदरील कारवाई *अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम व उपआयुक्त स.अजितपालसिंघ संधु* यांच्या निर्देशानुसार अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त रावण सोनसळे, अतिक्रमण पथक प्रमुख दत्ता कल्याणकर, विशाल सोनकांबळे यांच्यासह अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण विभाग व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई पार पाडली.
*मनपा प्रशासनाचा कडक इशारा*
शहरातील सर्व व्यावसायिक आणि नागरिकांनी सार्वजनिक रस्ते, पदपथ आणि महापालिकेच्या जागेवर पुन्हा अतिक्रमण करू नये. अतिक्रमण काढण्याच्या कारवाईत जप्त केलेले साहित्य परत केले जाणार नाही आणि दंडही ठोठावला जाईल. त्यामुळे शहराच्या विद्रुपीकरणाला कारणीभूत ठरणारे आणि वाहतुकीला अडथळा ठरणारे अतिक्रमण स्वतःहून काढून घ्यावे, अन्यथा मनपातर्फे अशाच प्रकारे तीव्र स्वरूपाची बुलडोझर कारवाई करण्यात येईल,असा इशारा *मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे* यांनी दिला आहे.