करदात्यांना सुलभता प्राप्त व्हावी विभागाकडून विविध सुविधा : सहआयुक्त सौ.रंजना देशमुख

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 30/06/2026 9:29 PM

नांदेड :- वस्तू व सेवा कर प्रणालीने देशात 'एक राष्ट्र, एक कर' ही संकल्पना प्रत्यक्षात आणली असून, गेल्या नऊ वर्षात कर प्रणालीत पारदर्शकता, सुलभता आणि कार्यक्षमता वाढीस लागली आहे. करदाते, व्यावसायिक आणि विभागीय अधिकारी-कर्मचारी यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच ही वाटचाल यशस्वी ठरली आहे, असे प्रतिपादन नांदेड विभागाच्या राज्यकर सहआयुक्त सौ. रंजना विश्वास देशमुख यांनी या निमित्ताने केले आहे.

बुधवार 1 जुलै 2026 रोजी देशभरात ९ वा वस्तू व सेवा कर (जीएसटी) दिन साजरा होत असून यानिमित्ताने राज्यकर सहआयुक्त सौ. रंजना विश्वास देशमुख यांनी सर्व करदाते, सनदी लेखापाल, कर सल्लागार, लेखापाल तसेच विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. 

सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्याने वस्तू व सेवा कर (जीएसटी) मधून रु. ३,५७,८९७ कोटी तर महाराष्ट्र मूल्यवर्धित कर (MVAT) मधून रु. ५८,८५० कोटी असे मिळून एकूण रु. ४,१६,७४७ कोटी इतके महसूल संकलन केले असून, ही राज्यासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.

नांदेड विभागानेही याच कालावधीत उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. नांदेड, लातूर व धाराशिव या तीन जिल्ह्यांचा समावेश असलेल्या नांदेड विभागात जीएसटी मधून रु. १,०२४.४०/- कोटी तर MVAT मधून रु. ५१ कोटी असे एकूण रु. १,०७५.४० कोटींहून अधिक महसूल संकलन केले आहे. दिनांक ३१ मे २०२६ अखेर विभागात एकूण ३०,९९९ सक्रिय करदाते असून, ४२ अधिकारी व 134 कर्मचाऱ्यांच्या बळावर विभागाने महसूल संकलन हे काम यशस्वीपणे पार पाडले आहे, ही बाब विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमाची साक्ष देणारी आहे, असेही सौ. देशमुख यांनी नमूद केले.

करदात्यांना सुलभता प्राप्त व्हावी यासाठी वस्तू व सेवा कर विभागाकडून पुढील सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत: जलद नोंदणी, ६० दिवसांच्या आत परतावा प्रक्रिया (Refund Process), प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी करदात्यांच्या मदतीसाठी समर्पित GST हेल्पडेस्क, तसेच GSTN पोर्टलवर १०० टक्के ऑनलाइन कामकाज इत्यादी. यासोबतच विभागातील प्रत्येक अधिकारी, करदात्यांच्या GSTR-3B मासिक व त्रैमासिक विवरणपत्रांचा पाठपुरावा तसेच बनावट करदात्यांचा शोध घेण्याच्या कामात सातत्याने कार्यरत आहे. प्रलंबित थकबाकी वसुली, तसेच व्यापाऱ्यांची कर निर्धारणा, विवरणपत्रांची छानणी इ. कार्य विभागामार्फत यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहेत.

राज्यकर सहआयुक्त सौ. रंजना विश्वास देशमुख यांनी याप्रसंगी सर्व करदाते, सनदी लेखापाल, कर सल्लागार, लेखापाल आणि विभागातील सर्व अधिकारी-कर्मचारी यांचे महसूल संकलन करण्यात सहकार्य केल्याबद्दल मनःपूर्वक आभार मानले असून भविष्यातही या समन्वयातून राज्याच्या महसूल वाढीस हातभार लागेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी सर्वांना ९ व्या जीएसटी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या.

Share

Other News

ताज्या बातम्या