सत्यमेव जयते फार्मर कप २०२६ चा राज्यव्यापी स्पर्धेचा शुभारंभ;सोयाबीन तूर आंतरपीक पद्धती आणि कमी कालावधीचे वाण अवलंबण्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांचे आवाहन

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 29/06/2026 8:03 PM

नांदेड : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग, उमेद अभियान आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सत्यमेव जयते फार्मर कप २०२६ या राज्यव्यापी स्पर्धेचा शुभारंभ आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथे करण्यात आला. यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, पाणी फाउंडेशनचे संस्थापक आमीर खान हे हजर होते. मुख्यमंत्री यांनी दृश्य संवाद प्रणालीद्वारे राज्यभरातील शेतकरी व अधिकाऱ्यांशी संवाद साधला.

या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण नांदेड जिल्हा परिषद येथील कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, कृषी विकास अधिकारी डॉ. निलकुमार ऐतवडे, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी अवधूत गंजेवार, आत्माचे प्रकल्प उपसंचालक श्रीमती अर्चना गुंजकर, पाणी फाउंडेशनचे प्रवीण काथवटे, उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक द्वारकादास राठोड, जिल्हा व्यवस्थापक बाळाप्रसाद जंगीलवाड, तालुका कृषी अधिकारी संजय चातरमल, वसंत जारीकोटे, मेंटॉर, सोहेल सय्यद, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक, आत्मा, उपकृषी अधीकारी, मंडळ कृषी अधीकारी, सहाय्यक कृषी अधीकारी, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाला पंचमुखी शेतकरी गट, भूमिपुत्र महिला शेतकरी गट, कृषी शेती महिला गट, संबोधी महिला शेतकरी गट, जय शिवराय शेतकरी गट, अन्नपूर्णा महिला शेतकरी गट यांच्यासह जिल्ह्यातील अनेक महिला व पुरुष शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रारंभी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी मार्गदर्शन केल. नांदेड जिल्ह्यात फार्मर कप स्पर्धे अंतर्गत आज पर्यंत 841 शेतकरी गटांची बांधनी पुर्ण झालेली असून कृषी विभागाच्या योजनांचा प्राधान्याने लाभ शेतकरी गटांना देण्याचे शासनाचे धोरण असल्याचे त्यांनी सांगीतले. फार्मर कप अंतर्गत शेतकरी गटांना आत्मा प्रात्यक्षिकामधुन कमी खर्चाची जैव निविष्ठा निर्मीती केंद्रे देणे नियोजीत असल्याचे व या गटांना खरीप तसेच रब्बी हंगामातील पिक प्रात्यक्षिकासाठी अर्ज करण्याविषयी कृषी विभाग मार्गदर्शन करीत असल्याचे सांगीतले. फार्मर कप गट हे दशपर्णी अर्क, जीवामृत, बीजामृत, प्रक्षीथांबे इत्यादी कमी खर्चाचे लागवड तंत्रज्ञान अवलंब करीत असून भविष्यामध्ये प्रत्येक गावातील कृषी विस्तार कार्याचे नेतृत्व ही गटे प्राधान्याने करणार असल्याचे सांगीतले.
  
मुख्यमंत्र्यांच्या आभासी संवादानंतर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना यावर्षी एल-निनोच्या प्रभावामुळे कमी पर्जन्यमानाची शक्यता व्यक्त केली. त्यामुळे कमी कालावधीच्या वाणांचा, सोयाबीन तूर आंतरपीक पद्धतीद्वारे शेतीतील जोखीम कमी करण्याचा तसेच कमी पाण्यात अधिक उत्पादन देणाऱ्या पीकपद्धतींचा अवलंब करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. ज्वारी, बाजरी, मूग आणि उडीद यांसारख्या पिकांना प्राधान्य द्यावे. तसेच बेडवर टोकन पद्धतीने लागवड केल्यास बियाण्याची बचत होईल, असे त्यांनी सांगितले. 

जिल्ह्यात सध्या मनरेगा अंतर्गत जुन्या विहिरी व बोअरवेलचे पुनर्भरण सुरू असून आतापर्यंत सुमारे ३० लाख घनमीटर तलावातील गाळ काढण्यात आला आहे. तसेच ८४ किलोमीटर नाला सरळीकरणाची कामे पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली. नाल्यांच्या काठावर बांबू लागवड करण्यासह जलसंधारण उपक्रमात लोकसहभाग वाढवण्याचे आवाहनही त्यांनी केले.

कृषी विभाग, उमेद अभियान आणि पाणी फाउंडेशन यांच्या माध्यमातून जिल्ह्यात ८८१ शेतकरी गटांची उभारणी करण्यात येत असून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गटांना बायोलॅब प्रकल्प उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.

यावेळी शेतकऱ्यांनी युरिया खताचा अतिरेक टाळून रासायनिक खतांचा वापर कमी करावा, नैसर्गिक शेतीला प्राधान्य द्यावे तसेच घरगुती बियाणे जतन करून त्यांचा पेरणीसाठी वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. तर पाणी फाउंडेशनचे प्रवीण काथवटे यांनी शेतकरी गटांच्या उपक्रमांची माहिती दिली.

सौ. सुमनबाई दिगंबर गायकवाड मु. पो.भोसी ता.भोकर जि. नांदेड यांची उद्यान पंडित पुरस्कार 2023, 
गोविंद बाबुराव शिंनगारे मु. पो. बिजूर ता. बिलोली जि. नांदेड यांची वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट ) 2023 व विश्वनाथ गोविंदराव होळगे मु. पो. दापशेड ता.लोहा जि. नांदेड यांची कृषीभूषण (सेंद्रिय शेती)2024 पुरस्कारासाठी निवड झाल्यामुळे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले  यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Share

Other News

ताज्या बातम्या