नांदेड :- भोकर विधानसभा मतदारसंघातील भोकर व मुदखेड येथे सामाजिक न्याय विभागांतर्गत निवासी शाळा आणि वसतिगृह उभारण्याच्या मागणीसाठी आमदार श्रीजया चव्हाण यांनी आज विधानसभेत औचित्याचा मुद्दा मांडला. या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांच्या या महत्त्वाच्या प्रश्नाकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले.
विधानसभेत आपली मागणी मांडताना आमदार श्रीजया चव्हाण म्हणाल्या की, भोकर आणि मुदखेड येथे निवासी शाळा तसेच वसतिगृह बांधण्यासंदर्भातील प्रस्ताव शासनाकडे सुमारे दोन वर्षांपूर्वीच सादर करण्यात आला आहे. मतदारसंघातील ग्रामीण भागातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांची निवासासह शिक्षणाची सोय व्हावी, यासाठी भोकर येथे निवासी शाळा आणि मुदखेड येथे आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलांसाठी वसतिगृह उभारणे अत्यंत आवश्यक आहे.
सध्या या सुविधांअभावी मागासवर्गीय तसेच आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांची अत्यंत गैरसोय होत असून, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये अडचणी निर्माण होत आहेत. ही बाब स्थानिक विद्यार्थ्यांच्या आणि व्यापक सार्वजनिक हिताची असल्याने शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि या प्रलंबित प्रस्तावाला लवकरात लवकर मंजुरी द्यावी, अशी मागणी आमदार श्रीजया चव्हाण यांनी यावेळी केली.