सांगली, दि. २९ जून २०२६ : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून भांडवली मूल्यावर आधारित करण्यात आलेल्या वाढीव घरपट्टीच्या विरोधात वाढीव घरपट्टी विरोधी कृती समितीच्या वतीने आज महापालिका मुख्यालयासमोर गांधीगिरीच्या माध्यमातून शांततापूर्ण आंदोलन करण्यात आले.
यावेळी माननीय महापौर, स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेते तसेच महासभेस उपस्थित असलेल्या सर्व सन्माननीय सदस्यांना गुलाबाचे फूल देऊन सुमारे दहा पानांचे अभ्यासपूर्ण निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनामध्ये भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी आकारणीतील विविध त्रुटी, कायदेशीर बाबी, नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात दाखल झालेल्या हरकती तसेच सर्वसामान्य नागरिकांवर होत असलेल्या अन्यायाची सविस्तर मांडणी करण्यात आली. या सर्व त्रुटींचा अभ्यास करण्यासाठी सर्वपक्षीय समिती नेमून विशेष महासभा बोलविण्यात यावी व आवश्यक त्या सुधारणा करून नागरिकांना न्याय द्यावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली.
कृती समितीच्या प्रतिनिधींनी उपस्थित लोकप्रतिनिधींना या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन पक्षीय राजकारण बाजूला ठेवत नागरिकांच्या हितासाठी सकारात्मक भूमिका घेण्याचे आवाहन केले. लोकशाही मार्गाने व गांधीगिरीच्या माध्यमातून नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष सुरूच राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या आंदोलनात वाढीव घरपट्टी विरोधी कृती समितीचे सतीश साखळकर, हणमंतराव पवार, नितीन मिरजकर, सुरेश टेंगले, बाळासाहेब मासुले, ओंकार माने, सुभाष तोडकर, शंभुराज काटकर, आनंद देसाई, अजय इनामदार, रवीकुमार पाटील, किरणराज कांबळे, संतोष चौगुले, श्रीशैल ढोले, विजयकुमार कांबळे, सिराज पन्हाळकर, अविनाश जाधव, मीरा सिंहासने, विवेकानंद मिरजकर, प्रसन्न कुलकर्णी, शाहीर पाटील, प्रवीण माळी आणि अनिल पाटील उपस्थित होते.
– वाढीव घरपट्टी विरोधी कृती समितीसांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्र