कौठा येथील डी.आय.जी. ऑफिस ते भगतसिंग चौक रस्ता रुंदीकरणातील अडथळे दूर;महानगरपालिकेची 'बुलडोझर' कारवाई

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 08/06/2026 7:48 PM

नांदेड : नांदेड शहराच्या पायाभूत सुविधांचा विकास आणि वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेने आज एक मोठी आणि धाडसी पाऊल उचलले आहे. कौठा परिसरातील डी.आय.जी. ऑफिस (विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय) ते भगतसिंग चौक या दरम्यान रस्ता रुंदीकरणाच्या कामात अनेक वर्षांपासून अडथळा ठरत असलेली अवैध अतिक्रमणे महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने भुईसपाट केली आहेत. या धडक कारवाईमुळे आता या भागात ३० मीटर रुंदीचा भव्य रस्ता तयार करण्याचा मार्ग निर्विघ्न झाला आहे.

कौठा ते असर्जन दरम्यान या भागातील वाढती वाहतूक लक्षात घेता हा रस्ता ३० मीटर रुंद केला जाणार होता. सदरील रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फत करण्यात येत असुन या रस्त्याची एकुण लांबी १.६३ कि.मी.अशी आहे. सदरील रस्त्याच्या कामास भगतसिंग चौकापासुन सुरुवात करण्यात आली होती परंतु पद्ममजा सिटीच्या परिसरात सदरील कामास स्थानिक प्लॉट धारकांनी विरोध दर्शविला होता. यामध्ये प्रामुख्याने स्थानिक भुधारकांच्या विरोधास न जुमानता महापालिकेने सिमांकनानुसार अतिक्रमण काढण्याची भुमिका घेत रस्त्याच्या कामातील अडथळा दुर केला आहे. कारवाईदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

हा रस्ता कौठा परिसराला शहराच्या मुख्य भागांशी जोडणारा एक महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र, रस्त्यावरील वाढत्या अतिक्रमणामुळे येथे सातत्याने वाहतूक कोंडी होत होती आणि अपघातांचा धोका वाढला होता. महापालिकेच्या या कारवाईमुळे स्थानिक नागरिक, वाहनचालक आणि व्यापारी वर्गाने सुटकेचा श्वास सोडला आहे. सदरील कारवाई *पालिका आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे, पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार व अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपआयुक्त स.अजितपालसिंघ संधु* यांच्या नेतृत्वात कार्यकारी अभियंता दिलीप टाकळीकर, नगररचनाकार ओम लहाने, उपअभियंता खुशाल कदम, अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त रावण सोनसळे, क्षेत्रिय अधिकारी रमेश चवरे, राजेश जाधव, अतिक्रमण पथक प्रमुख दत्ता कल्याणकर, विशाल सोनकांबळे यांच्यासह अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण विभाग व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई पार पाडली.

*महापालिकेचा इशारा*
शहराच्या विकास आराखड्यानुसार (DP Road) रस्त्यांचे रुंदीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. नागरिकांनी स्वतःहून रस्त्यावरील अतिक्रमणे काढून प्रशासनाला सहकार्य करावे, अन्यथा यापुढेही अशीच तीव्र मोहीम राबवून दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा महानगरपालिका प्रशासनाने दिलेला आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या