आरटी आय न्यूज नेटवर्क
विजय जगदाळे
सातारा : कायद्याचे पालन करण्याचे धडे सर्वसामान्य नागरिकांना देणारे अधिकारीच नियमांचे उल्लंघन करत असतील, तर जनतेने न्याय कुणाकडे मागायचा, असा सवाल उपस्थित होत आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या (सीईओ) खासगी वाहनावर अंबर दिवा लावून ते राजरोसपणे फिरत असल्याची चर्चा जिल्हाभर रंगली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आणि केंद्र शासनाच्या नियमांनुसार अंबर किंवा लाल दिव्यांच्या वापरावर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत खासगी वाहनावर अंबर दिवा लावून वावरणे कितपत कायदेशीर आहे, याबाबत नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
एकीकडे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सामान्य नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जाते, तर दुसरीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वाहनांकडे संबंधित यंत्रणा डोळेझाक करत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे "कायदा फक्त सर्वसामान्यांसाठीच आहे का?" असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
या प्रकरणाची चौकशी करून संबंधित वाहनाला अंबर दिवा वापरण्याची परवानगी आहे का, याबाबत प्रशासनाने खुलासा करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अन्यथा नियम एक आणि अंमलबजावणी दुसरी, असा संदेश जनतेत जाऊन प्रशासनाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
"नियम सर्वांसाठी समान असतील तरच कायद्याचा धाक टिकेल; अन्यथा जनतेचा संताप वाढण्याची भीती आहे."