नांदेड : शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी आणि नागरिकांच्या सुलभ दळणवळणासाठी नांदेड वाघाळा शहर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शनिवार दिनांक ०६.०६.२०२६ रोजी शहराच्या मध्यवर्ती भागातील जुना मोंढा ते शासकीय विश्रामगृह (रेस्ट हाऊस) मार्गावर धडक जंबो कारवाई केली. या धडक मोहिमेमध्ये रस्त्यावरील अनधिकृत टपऱ्या, शेड, दुकानांचे वाढीव ओटे आणि अनधिकृत फलक पूर्णपणे भुईसपाट करण्यात आले आहेत.
शहरातील जुना मोढा परिसरापासून ते वजिराबाद, कलामंदिर, शिवाजी नगर, आय. टी. आय. चौक ते थेट व्ही. आय. पी. रोडवरील रेस्ट हाऊसपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा असलेले सर्व कच्चे-पक्के अतिक्रमण जेसीबी आणि पोकलेन मशीनच्या साहाय्याने हटवण्यात आले. शहरातील या मुख्य रस्त्यावर व्यापाऱ्यांनी आणि हातगाडी चालकांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केल्यामुळे दररोज तीव्र वाहतूक कोंडी निर्माण होत होती. या कारवाईमुळे रस्ता पूर्णपणे मोकळा झाला आहे. या कारवाईदरम्यान कोणतीही कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून स्थानिक पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महापालिकेच्या पथकाने रस्त्यावर अडथळा ठरणारे साहित्य, लोखंडी काउंटर आणि इतर अनधिकृत फलक जप्त करून महापालिका कार्यालयात जमा केले आहेत.
सदरील कारवाई *पालिका आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे, पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार व अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपआयुक्त स.अजितपालसिंघ संधु* यांच्या नेतृत्वात अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण विभाग व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई पार पाडली. या कारवाईत पोलीस निरीक्षक मुंडे, शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक साकळे, कोटतीर्थवाले, टोईग वाहन इन्चार्ज नव्हाते यांच्यासह पोलीस अंमलदार घाडगे,सोनटक्के, चाटे, पोलीस हवालदार केंद्रे व त्यांच्या पथकाच्या सहकार्याने अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त रावण सोनसळे, क्षेत्रिय अधिकारी रमेश चवरे, गौतम कवडे, अतिक्रमण पथक प्रमुख दत्ता कल्याणकर यांच्यासह महापालिकेचे ३० कर्मचारी तसेच पोलीस विभागातील २० कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.
महापालिका प्रशासनाचा इशारा:
शहरातील प्रमुख रस्ते आणि बाजारपेठा अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी महापालिकेची ही मोहीम यापुढेही अशीच सातत्याने सुरू राहणार आहे. व्यापारी आणि नागरिकांनी स्वतःहून आपले अतिक्रमण काढून घ्यावे. या कारवाईनंतर जर कोणी पुन्हा त्याच ठिकाणी अनधिकृत बांधकाम किंवा व्यवसाय थाटण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असा कडक इशारा महानगरपालिका प्रशासनाने दिला आहे.