जिल्हा परिषदेचा आरोग्यदूत उपक्रम स्तुत्य; विद्यार्थीच करतील गावांचा कायापालट - जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 08/06/2026 7:39 PM

नांदेड :- जिल्हा परिषदेने विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेला आरोग्यदूत उपक्रम स्तुत्य असून शालेय विद्यार्थी आरोग्यदूत म्हणून गावागावांमध्ये आरोग्य जनजागृती घडवून आणतील आणि गावांचा कायापालट करतील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने नांदेड येथील शंकरराव चव्हाण सभागृहात आयोजित आरोग्यदूत प्रशिक्षकांच्या प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सागर, पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा उपायुक्त एस. बी. खुणे, कृषी विकास अधिकारी डॉ. नीलकुमार ऐतवडे, सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रवीणकुमार घुले, डॉ. राजाभाऊ गुट्टे, जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. संतोष नवले, डॉ. शिवशक्ती पवार, डॉ. सलमा हिराणी, दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी अवधूत गंजेवार, मुख्यमंत्री फेलो भार्गवी मुंढे, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक शुभम तेलेवार आदी उपस्थित होते.

पुढे ते म्हणाले, ग्रामीण भागात आजही अनेक नागरिक किरकोळ आजारांवर योग्य वैद्यकीय उपचार घेण्याऐवजी अंगावर दुखणे काढण्याचा प्रयत्न करतात. अशा परिस्थितीत नागरिकांना आरोग्याविषयी प्राथमिक माहिती देणारी आरोग्यदूत संकल्पना अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. आरोग्यदूत ही लोकचळवळ जिल्ह्यात आरोग्यसंपन्न समाज घडविण्यासाठी प्रभावी माध्यम ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांना आरोग्य शिक्षणाबरोबरच कृषी, पशुसंवर्धन, स्वच्छता, पोषण आहार याविषयी माहिती द्यावी. या उपक्रमातून प्रशिक्षित विद्यार्थी आपल्या कुटुंबात आणि गावात आरोग्यविषयक मार्गदर्शकाची भूमिका पार पाडतील, असेही त्यांनी सांगितले.
--------------
*चौकट*
*आरोग्यदूत उपक्रमातून जनजागृतीसह वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना*
*- मेघना कावली*
ग्रामीण भागातील नागरिकांना प्राथमिक आरोग्यविषयक माहिती सहज उपलब्ध व्हावी, आरोग्याबाबतचे गैरसमज दूर व्हावेत आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा, या उद्देशाने जिल्ह्यात आरोग्यदूत उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी दिली.

     त्या म्हणाल्या, या उपक्रमाद्वारे गावपातळीवर आरोग्यविषयक जनजागृती, मार्गदर्शन आणि लोकसहभाग वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. आरोग्यदूतांच्या माध्यमातून विविध आजारांबाबत प्राथमिक माहिती, प्रतिबंधात्मक उपाययोजना, स्वच्छतेचे महत्त्व, पोषण, पशू व मानव आरोग्याशी संबंधित बाबी तसेच अपघात व आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

      आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ, डॉक्टर आणि विविध विभागांच्या समन्वयातून हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येणार असून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आरोग्यविषयक जागरूकतेची व्यापक चळवळ उभी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
-----------
     कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर विद्यार्थी व प्रशिक्षकांसाठी तयार करण्यात आलेल्या आरोग्यदूत या दोन मार्गदर्शक पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे व मुख्यमंत्री फेलो भार्गवी मुंढे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्यवहारे यांनी केले, तर आभार रेणुका दराडे यांनी मानले.
     या प्रशिक्षण कार्यशाळेत शिक्षणाधिकारी माधव सलगर यांनी शिक्षण विषयक, कृषी विकास अधिकारी डॉ. नीलकुमार ऐतवडे यांनी कृषी विषयक, सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रवीणकुमार घुले यांनी पशुसंवर्धन विषयक, तर जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी आरोग्य विषयक मार्गदर्शन केले. या प्रशिक्षण कार्यशाळेस जिल्ह्यातील तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जुनेद सलीम, सुभाष खाकरे तसेच आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Share

Other News

ताज्या बातम्या