नांदेड :- शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी आणि रस्ते मोकळे करण्यासाठी आज नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका आणि पोलीस विभाग यांच्या वतीने संयुक्तपणे मोठी अतिक्रमण विरोधी मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत बर्की चौक ते हबीब टॉकीज ते जुना मोंढा दरम्यानच्या मुख्य रस्त्यावरील सर्व अतिक्रमणे हटवण्यात आली असुन मंगळवार दिनांक ०२.०६.२०२६ रोजी महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथक व पोलीस प्रशासनाने बर्की चौक ते जुना मोंढ़ा या परिसरातील रस्त्याच्या दोन्ही बाजुने झालेले अतिक्रमण काढुन टाकले आहे. या कार्यवाहीने जुन्या नांदेड मधील मुख्य रस्त्याने मोकळा श्वास घेतला असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.
महानगरपालिकेने या कार्यवाही दरम्यान रस्त्यावर अनधिकृतपणे लावलेले हातगाडे, फ्लेक्स बोर्ड, लोखंडी शेड आणि पक्क्या बांधकामांचे वाढीव भाग जमीनदोस्त करण्यात आले. बर्की चौक ते जुना मोंढा हा व्यापारी भाग असल्याने येथे नेहमीच ग्राहकांची गर्दी असते. मात्र, रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या अतिक्रमणांमुळे रुग्णवाहिका आणि इतर वाहनांना जाण्यास मोठा अडथळा निर्माण होत होता. वारंवार सूचना देऊनही अतिक्रमण न काढल्याने ही कठोर पाऊले उचलण्यात आली आहेत. या कारवाईत जेसीबीच्या सहाय्याने जवळपास २५ ते ३० अतिक्रमण धारकांवर कारवाई करण्यात आली तसेच तब्बल ०२ ट्रक माल जप्त करण्यात आला आहे.
सदरील कारवाई *पालिका आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे, पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार व अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपआयुक्त स.अजितपालसिंघ संधु* यांच्या नेतृत्वात अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण विभाग व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई पार पाडली. या कारवाईत इतवारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा व त्यांच्या पथकाच्या सहकार्याने अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त रावण सोनसळे, क्षेत्रिय अधिकारी रमेश चवरे, मिर्जा बेग, रावण सोनसळे, गौतम कवडे, अतिक्रमण पथक प्रमुख दत्ता कल्याणकर यांच्यासह महापालिकेचे ३० कर्मचारी तसेच पोलीस विभागातील २० कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.
महानगरपालिका हद्दीत मुख्य रस्त्यावर व्यापाऱ्यांनी व नागरीकांनी कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण न करता रहदारीस अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात येत आहे.शहरातील मुख्य रस्ते अथवा इतरत्र अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधीतावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा महापालिका प्रशासना तर्फे देण्यात येत असुन यापुढे सुध्दा महानगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने शहरातील अतिक्रमण धारकांवर कारवाई करण्याची मोहिम सुरुच राहील असे यावेळी मनपा *उपआयुक्त स.अजितपालसिंघ संधु* यांनी स्पष्ट केले.