पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी नांदेडमधील तक्रारदारांशी साधला 'संवाद'

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 30/05/2026 8:10 PM

नांदेड:-नागरिकांच्या तक्रारी समजावून घेऊन, त्यांचा जलद निपटारा करणे व पोलीस नागरिक यांच्यातील संवाद वाढवून, लोकाभिमुख कामकाजाद्वारे जनतेचा पोलीसांवरील विश्वास दृढ करणे, या उद्देशाने पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी नांदेड परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांत 'जनसंवाद' उपक्रम सुरू केला आहे. सदर उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना थेट पोलीस उप महानिरीक्षक यांच्यासमोर आपली व्यथा मांडण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी, पोलीस उप महानिरीक्षक हे प्रत्येक महिन्यास जिल्हा मुख्यालयांना भेटी देत असतात. यादरम्यान, त्या त्या जिल्ह्यातील तक्रारदारांना प्रत्यक्ष भेटून, त्यांच्या तक्रारी व अडीअडचणी समजावून घेऊन, त्या तत्परतेने सोडवण्याचा पोलीस उप महानिरीक्षक यांचा प्रयत्न आहे. चालू महिन्यात, लातूर, हिंगोली व परभणी या जिल्ह्यातील नागरिकांनी या उपक्रमाचे माध्यमातून, मोठ्या प्रमाणावर आपल्या तक्रारी पोलिस उप महानिरीक्षक यांच्यासमोर मांडल्या होत्या.

दिनांक 30 मे रोजी, पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी, पोलीस अधीक्षक, नांदेड कार्यालयात जिल्हा पोलीसांच्या कामकाजाचा मासिक आढावा घेतल्यानंतर, दुपारी 12.30 ते 02.30 या वेळेत जिल्ह्यातील तक्रारदारांशी 'संवाद' साधला. यादरम्यान, एकूण 37 तक्रारदारांनी आपले लिखित अर्ज पोलीस उप महानिरीक्षक यांना सोपविले. यात, मालमत्ता विषयक वाद, हरवलेले इसम, सायबर फसवणूक, दाखल गुन्ह्यांचा तपास, अवैध व्यवसाय, इत्यादी तक्रारींचा समावेश आहे. त्याचप्रमाणे, इतर उपस्थितांनी पोलीसांच्या कामकाजाबाबत अधिक अपेक्षा व्यक्त केल्या.

सदर दिवशी, प्राप्त तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन, त्यांच्या तक्रारी शिघ्र सोडवणुकीसाठी संबंधित अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना आवश्यक त्या सूचना व निर्देश देण्यात आले आहेत.

तक्रारदारांकडून प्राप्त होणाऱ्या अर्जाच्या शिघ्र सोडवणुकीसाठी, पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाने यापूर्वीच 'संवेदना' ही तक्रार निवारण प्रणाली सुरू केली आहे. आज रोजी 'जनसंवाद' उपक्रमादरम्यान, प्राप्त झालेले सर्व अर्ज 'संवेदना' पोर्टलच्या माध्यमातून पुढील चौकशी व कार्यवाहीसाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात येणार असून, प्रत्येक तक्रारीवर झालेल्या कार्यवाहीचा आढावा नांदेड परिक्षेत्र कार्यालयातील फीडबॅक टीममार्फत घेण्यात येणार आहे.

याप्रसंगी, पोलीस अधीक्षक श्री अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री सुरज गुरव व जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी हे हजर होते.

Share

Other News

ताज्या बातम्या