नांदेड :- यंदाच्या खरीप हंगामात ‘अल -निनो’चा प्रभाव राहण्याची शक्यता लक्षात घेता शेती क्षेत्रात हवामान अनुरूप नियोजन व तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी नांदेड येथे “ खरीप हंगाम 2026 दरम्यान अल निनो संभाव्य कृषी आपत्कालीन परिस्थिती आकस्मिक नियोजनासाठी जनजागृती बैठक” दिनांक २५ मे २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाली.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या,हैद्राबाद येथील केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्था (क्रीडा - CRIDA) व कृषी विभाग, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते. प्रमुख पाहुणे म्हणून ‘क्रीडा’ संस्थेचे संचालक डॉ. व्ही. के. सिंग उपस्थित होते.
कार्यशाळेस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, किनवट उपविभागीय अधिकारी दिलीप जाधव, डॉ. प्रवीण कुमार घुले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रवीणकुमार घुले, जिल्हा रेशीम विकास अधिकारी वडवळे, जलसंधारण विभागाचे अधिकारी, डॉ. देविकांत देशमुख, प्रमुख शास्त्रज्ञ,कृषी विज्ञान केंद्र,पोखरणीचे, डॉ. देविकांत देशमुख, डॉ. कृष्णा अंभोरे, शास्त्रज्ञ,कृषी विज्ञान केंद्र,सगरोळीचे डॉ. कृष्णा अंभोरे, तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ व ‘क्रीडा’चे शास्त्रज्ञ डॉ. राजेश कदम, डॉ. जी. रवींद्र चारी, डॉ. जे. व्ही. एन. एस. प्रसाद, डॉ. एस. के. बल, डॉ. मनोरंजन कुमार, डॉ. आनंद गोरे, डॉ. अरविंद पंडागळे, डॉ. मधुकर मोरे, डॉ. वसंत सूर्यवंशी, भानुदास पेंडकर, डॉ पपीता गौरखेडे, डॉ. बस्वराज भेदे, आत्मा नांदेड अंतर्गत सर्व तालुक्यांचे गट तंत्रज्ञान व्यवस्थापन आणि सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक,स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि प्रगतिशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्रमणि यांनी शेतकऱ्यांची सेवा करणे, त्यांना उपयुक्त तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे आणि संकटकाळात त्यांना पाठबळ देणे हे विद्यापीठाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगितले. त्यांनी अतिवृष्टी, अल्पवृष्टी, पावसातील खंड, तापमान वाढ इत्यादी बदलत्या हवामानामुळे शेतीसमोर निर्माण होत असलेल्या नव्या आव्हानांकडे लक्ष वेधले.
एल-निनोसारख्या परिस्थितीवर प्रभावीपणे मात करण्यासाठी कृषी विद्यापीठ, कृषी व संलग्न विभागांनी परस्पर समन्वयातून काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. खरीप हंगामात विद्यापीठाचे सर्व शास्त्रज्ञ थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करतील, अशी ग्वाही देत विद्यापीठ शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव कार्यरत राहील, असे सांगितले.
‘क्रीडा’ संस्थेचे संचालक डॉ. व्ही. के. सिंग यांनी नांदेड जिल्ह्यात पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी कोरडवाहू शेती तंत्रज्ञान, शेततळे आणि मूलस्थानी जलसंधारण उपायांचा अवलंब आवश्यक असल्याचे सांगितले. तालुकानिहाय जमीन प्रकार आणि पाऊसमान लक्षात घेऊन पिके व पीकपद्धती निवडण्याचा सल्लाही त्यांनी दिला. तसेच रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय व जीवाणू खतांचा वापर वाढविण्याचे आवाहन केले.
प्रारंभी सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेश कदम यांनी विद्यापीठाच्या “माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत” या उपक्रमाची माहिती दिली.
जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी कृषी विभागाच्या आकस्मिक नियोजनाची माहिती देताना प्रत्येक गावात गाव बैठका आणि प्रात्यक्षिकाद्वारे खरीप हंगामपूर्व जनजागृती मोहिमा राबवीत असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये हवामान अनुकूल शेती तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके, सेंद्रिय निविष्ठा निर्मितीसाठी नैसर्गिक शेती शाळाआयोजनाविषयी माहिती दिली . महाविस्तार ॲपद्वारे शेतकरी बांधवांना आता फोन कॉलद्वारे कृषी सल्ला मिळविणे आणि शेतातील पिकांचे फोटो काढून कीड रोगांची ओळख आणि सुयोग्य औषध फवारणी विषय माहिती सुविधा उपलब्ध झाल्याचे सांगितले. यावेळी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी आणि शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना उपयुक्त मार्गदर्शन केले.
यावेळी कृषि हवामान तज्ज्ञांनी यंदाच्या पावसाबाबत अंदाज व्यक्त केला. ‘क्रीडा’चे प्रकल्प समन्वयक डॉ. एस. के. बल यांनी २०२६ मध्ये प्रशांत महासागरात मध्यम तीव्रतेची एल-निनो स्थिती राहण्याची शक्यता असल्याने हंगामाच्या मध्यात पावसात खंड पडू शकतो, असे सांगितले. विद्यापीठाचे मुख्य हवामानशास्त्रज्ञ डॉ. के. के. डाखोरे यांनी जूनमध्ये सरासरी इतके किंवा त्यापेक्षा कमी, तर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तवली.
शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. जे. व्ही. एन. एस. प्रसाद आणि डॉ. आनंद गोरे यांनी हवामानानुसार चार टप्प्यांचे पीक नियोजन सुचविले. पाऊस वेळेवर झाल्यास सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, भुईमूग आदी पिके घ्यावीत. पाऊस उशिरा आल्यास बाजरी, सूर्यफूल, तूर यांसारख्या कमी पाण्यात येणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावे. सोयाबीन + तूर, कापूस + उडीद, बाजरी + तूर या आंतरपीक पद्धतींचा अवलंब करून शेतीतील जोखीम कमी करण्याचा सल्ला देण्यात आला. तसेच पेरणीपूर्वी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, उताराला आडवी पेरणी, पिकांच्या सहा ते आठ ओळीनंतर मृत सरी काढणे , रुंद वरंबा-सरी पद्धत, कमी कालावधीचे वाण आणि सेंद्रिय खतांचा वापर करावा, असेही त्यांनी सांगितले.
तसेच डॉ. वसंत सूर्यवंशी, कृषी विद्यावेता यांनी एल-निनोच्या संकटावर मात करण्यासाठी घरचे बियाणे, बीज उगवण क्षमता तपासणी आणि बीज प्रक्रिया, बीबीफचा वापर अशी त्रिसूत्री सांगितली.
विविध तालुक्यातून आलेले शेतकरी रत्नाकर ढगे, श्री. अडकीने , श्री, भगवान इंगोले, श्रीमती सुषमा देव अशा अनेक प्रगतशील शेतकऱ्यांनी चर्चेत सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पपिता गौरखेडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. एम. आर. मोरे यांनी केले. कार्यक्रमास जिल्ह्यातील २५० हून अधिक प्रगतिशील शेतकरी, कृषी व संलग्न विभागांचे अधिकारी, कृषी विज्ञान केंद्रांचे शास्त्रज्ञ तसेच विविध संशोधन केंद्रांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सुरेश खटींग, व्ही.जे. रिठ्ठे,
अमर राऊत व अभास कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वनामकृवि, परभणी येथील शास्त्रज्ञ, कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि आत्मा अंतर्गत गट तंत्रज्ञान व्यवस्थापक आणि सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक यांनी परिश्रम घेतले.