पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू : पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीला पालकमंत्री अतुल सावे यांची ग्वाही

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 01/05/2026 8:08 PM

नांदेड - राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रकार संरक्षण कायद्याची तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी निश्चित पाठपुरावा करू अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी आज पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळास दिली. महाराष्ट्र शासनाच्या अधिस्वीकृती समितीचे लातूर विभागीय अध्यक्ष विजय जोशी,पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा समन्वयक राम तरटे यांच्या पुढाकारातून शिष्टमंडळाने पालकमंत्र्यांची आज भेट घेऊन निवेदन दिले. त्यावेळी ना. सावे बोलत होते. 
अ.भा.मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त,पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकारांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्र्यांची नियोजन भवन नांदेड येथे भेट घेतली. यावेळी खा. अशोकराव चव्हाण , आ. बालाजीराव कल्याणकर , आ. आनंदराव बोंढारकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांचीही उपस्थिती होती.
       राज्यात पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.त्यामुळे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ ओळखल्या जाणाऱ्या माध्यम क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे.निर्भीडपणे पत्रकारिता करण्यासाठी पत्रकारांवर अप्रत्यक्ष दबाव येत आहे.ही परिस्थिती लक्षात घेता लोकशाहीला अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्रात सर्वप्रथम 2017 मध्ये हा कायदा बनविण्यात आला.त्यानंतर नोव्हेंबर 2019 मध्ये या कायद्याच्या मसुद्यावर महामहीम राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली असली तरीही महाराष्ट्र सरकारने आजपर्यंत हा कायदा प्रभावीपणे अमलात आणलेला नाही. त्यामुळे पत्रकार संरक्षण कायद्याची तातडीने कठोर अंमलबजावणी करावी. पत्रकार संरक्षण कायद्याची शासन अधिसूचना तातडीने जारी करावी. यासाठी आपण आपल्या स्तरावरून राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांच्याकडे पाठपुरावा करावा.पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र या देशातील पहिले राज्य व्हावे यासाठी आपण पाठपुरावा करावा अशी मागणी आज पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.  
निवेदनावर परिषदेचे उपाध्यक्ष प्रकाश कांबळे , पत्रकार अधिस्वीकृती समितीचे विभागीय अध्यक्ष विजय जोशी, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा निमंत्रक प्रदीप नागपूरकर ,  जिल्हा समन्वयक राम तरटे ,नांदेड महानगर मराठी पत्रकार संघ कार्याध्यक्ष गजानन कानडे, माजी जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण भवरे, जिल्हा सरचिटणीस अनुराग पोवळे,अंकुश सोनसळे, योगेश लाटकर, अ.भा. डिजीटल मिडिया संपादक व पत्रकार संघटना मराठवाडा अध्यक्ष प्रवीण खंदारे, जिल्हाध्यक्ष महेंद्र देमगुंडे,राजू कोटलवार, महानगर मराठी पत्रकार संघाचे कंथक सूर्यतळ, प्रशांत गवळे, डिजीटल मिडियाचे जिल्हा कार्याध्यक्ष संघरत्न पवार, जयवर्धन भोसीकर,कुवरचंद मडले, अभिषेक एकबोटे, नकुल जैन, मोहम्मद रफीख, राहुल सरपाते , पुरुषोत्तम जोशी आदी पत्रकारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Share

Other News

ताज्या बातम्या