नांदेड : गेल्या काही दिवसांपासून नांदेड शहराच्या विविध भागांत वीज पुरवठा खंडित होण्याच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली आहे. या वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेत, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या *महापौर सौ.कविता संतोष मुळे* यांनी आज महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एक महत्त्वाची आढावा बैठक महापालिकेत पार पडली. या बैठकीला महापौरांसह उपमहापौर दिपकसिंह रावत, सभागृह नेता ॲड महेश कनकदंडे, महापौर प्रतिनिधी संतोष मुळे, माजी उपमहापौर सतीश देशमुख, नगरसेवक संजय मोरे, अभिषेक सौदे, राजु काळे, तुलजेश यादव, राजेश यन्नम, महावितरणचे अधिक्षक अभियंता विनय घनबाहादुर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुरेंद्र कांबळे, बळवंत बोननकर, सहाय्यक अभियंता सचिन कल्याणकर, बळीराम तोटेवाड, प्रियंका तम्मेडवार, तसेच महानगरपालिकेचे शहर अभियंता सुमंत पाटील, कनिष्ठ अभियंता राजकुमार बोडके आदी उपस्थित होते.
उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना वीज वारंवार खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे नागरिक त्रस्त असून महावितरणने तांत्रिक बिघाड त्वरित दुरुस्त करून अखंडित वीज पुरवठा करावा, अशा सूचना महापौरांनी दिल्या. शहरातील वीज तक्रारींसाठी असलेले टोल-फ्री क्रमांक आणि स्थानिक तक्रार निवारण केंद्रे तत्परतेने काम करत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत आहेत. ही केंद्रे २४ तास कार्यान्वित ठेवून नागरिकांना तात्काळ प्रतिसाद देण्यात यावा. त्याचप्रमाणे आगामी पावसाळा लक्षात घेता, धोकादायक विद्युत तारा, वाकलेले खांब आणि झाडांच्या फांद्या छाटणीची कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. शहरातील पथदिव्यांच्या वीज पुरवठ्याबाबत मनपा आणि महावितरणमध्ये समन्वय असावा, जेणेकरून मुख्य रस्ते अंधारात राहणार नाहीत. पायाभूत सुविधे संदर्भात नवीन ट्रान्सफॉर्मर बसवणे आणि जुन्या वाहिन्या बदलण्याचे काम प्राधान्यक्रमाने हाती घेण्याचे महापौरांनी सूचित केले.
बैठकी दरम्यान महावितरणच्या अधिकाऱ्यांनी उत्तर नांदेड भागातील विजेच्या तक्रारी पाहता नव्याने ५० डी.पी.बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे सांगितले. या नव्याने प्रस्तावित असलेल्या डी.पी.साठी महापालिकेमार्फत ओपन स्पेसच्या जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. त्याचप्रमाणे पिरबुऱ्हान नगर भागातील महापालिकेची १ एकर जागा उपकेंद्रासाठी देण्यात येत असल्याबाबत यावेळी महावितरण अधिकाऱ्यांनी महापौरांचे आभार व्यक्त केले. एकंदरीत महावितरणला महापालिका प्रशासन सर्वोतपरी सहकार्य करेल असे अश्वासन यावेळी महापौरांनी दिले.
यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी शहरात सुरू असलेल्या कामांची माहिती दिली आणि वाढत्या लोडमुळे येणाऱ्या तांत्रिक अडचणी लवकरच सोडवण्याचे आश्वासन दिले. नागरिकांच्या सोयीसाठी महावितरण आणि महानगरपालिका संयुक्तपणे समन्वय गट स्थापन करतील, असेही बैठकीत ठरवण्यात आले आहे.