“विश्वगुरू… की भविष्य?”

  • मुख्यसंपादक (Kolhapur)
  • Upadted: 28/04/2026 4:04 AM

जात-धर्माच्या ज्वाळांत, आपणच घर जाळतो, आणि तरी छाती ठोकून “विश्वगुरू” म्हणवतो…कधी धर्म, कधी जात, नवे-नवे फंडे येतात, लोकांना भिडवून काहींचे सिंहासन सजतात…भांडणांच्या राखेवरच सत्ता फुलत राहते आणि आपली मुलं मात्र भविष्य हरवत जातात…
हातात पुस्तकाऐवजी घोषणांचा गोंधळ, मनात ज्ञानाऐवजी राग भरतो…काम, शिक्षण, उद्योग सोडून, आपणच अंधारात भरकटत जातो…हिंदू-मुस्लिम नावाखाली भिंती उभ्या केल्या, मनामनात संशयाच्या सावल्या पेरल्या…
“वसुधैव कुटुंबकम्” आपणच विसरलो, ममत्वाचे धागे आपणच तोडून टाकले, एकमेकांच्या आस्थांचा आदर करायचा सोडून, आपणच वैर वाढवत चाललो… समोरच्याला चार मारले तर तो दोन मारणारच, असं करून प्रश्न कधी सुटत नाही, तो वाढतच राहतो…विरोधाचा आवाज उठला की शिव्यांचा पाऊस पडतो, गोदी मीडिया वळचणीला गेली पण सच्चा प्रश्न विचारणारा पत्रकारही आज धास्तावून जगतो…वृद्धांचा सन्मान हरवतो, महिलांकडेही तिरस्कार, हा कोणता विकास, हा कोणता संस्कार…?
कधी विचार केलात का आपली मुलं काय शिकतायत…?
द्वेष, टोमणे, भांडण…
की कौशल्य, शिक्षण, प्रगतीकडे वळतायत…? जात सोडून कामाला लागू, धर्म सोडून धंदा उभा करू…हातात काम, डोक्यात विचार, असं भविष्य का नको घडवू…?
लढायचंच असेल तर अज्ञानाशी लढा, हरवायचंच असेल तर गरिबी हरवा, जिंकायचंच असेल तर कौशल्य जिंका, मुलांना उज्ज्वल वाट दाखवा…
देश “विश्वगुरू” तेव्हाच बनेल,
जेव्हा प्रत्येक घरात ज्ञान फुलेल जेव्हा ममत्वाने माणूस माणसाशी जोडला जाईल,
आणि एकतेचा दीप प्रत्येक मनात पेटेल म्हणून थांबा आता विचार बदला, द्वेष नाही, तर दिशा द्या.
राजकारणाच्या खेळात न अडकता,आपल्या मुलांच्या भविष्यासाठी उभे रहा,कारण आज आपण काय पेरतोय,
उद्या आपल्या मुलांनी तेच उगवायचं आहे, आणि तेच ठरवणार आहे. आपण खरंच “विश्वगुरू” आहोत… की फक्त बोलतोय…!

Share

Other News

ताज्या बातम्या