सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या आयुक्त **श्रीम. संजीता महापात्र** यांनी विभागीय क्षेत्रीय कार्यालय क्र. ३ कुपवाड अंतर्गत वॉर्ड क्रमांक २ व ८ मधील विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली.
“शहरातील पायाभूत सुविधांची कामे विहित मुदतीत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत,” असे निर्देश देत त्यांनी प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यावर भर दिला.
या पाहणी दौऱ्यात आयुक्तांनी नाल्यांची कामे, रस्ते रुंदीकरण, उद्याने आणि अभ्यासिकेचा सविस्तर आढावा घेतला.
चैत्रबन नाला तसेच खारी मळा ते आनंद नगर नाला कामाची पाहणी केली. चैत्रबन नाल्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश मक्तेदारास देण्यात आले.
विकास कॉलनी व झेडपी कॉलनी परिसरातील अतिक्रमणांची पाहणी करून ती तत्काळ काढण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
लक्ष्मी मंदिर ते सूतगिरणी चौक रस्ता आणि राजे मल्हारराव होळकर चौक रुंदीकरणाची पाहणी करून आढावा घेतला. तसेच स्व. मदनभाऊ पाटील स्टेडियम व कुपवाड चिल्ड्रन पार्कच्या उर्वरित कामांना गती देण्याच्या सूचना केल्या.
आयुक्तांनी कुपवाड क्षेत्रीय कार्यालयातील विविध उपविभागांना भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली.
यावेळी स्थानिक नगरसेवक संतोष पाटील, विष्णू माने, दीपक वायदंडे, योगिता राठोड, मीनाक्षी पाटील व नागरिक उपस्थित होते.
सांगली येथील वि. स. खांडेकर अभ्यासिकेस भेट दिली असता, आयुक्तांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. अभ्यासिकेत **MPSC/UPSC अभ्यास केंद्र** सुरू करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. विद्यार्थ्यांसाठी आयएएस(IAS)/आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करणे, स्पर्धा परीक्षेसाठी नवीन पुस्तकांची खरेदी करणे आणि इमारतीची किरकोळ दुरुस्ती करण्याबाबत त्यांनी संबंधित विभागाला आदेश दिले.
या दौऱ्यात अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता पृथ्वीराज पाटील, कार्यकारी अभियंता चिदानंद कुरणे, सहाय्यक संचालक (नगररचना) हणमंत मारनूर, मुख्य स्वच्छता अधिकारी सचिन सागावकर, सहाय्यक आयुक्त विनायक शिंदे, उपअभियंता महेश मदने, अमीरहमजा मुलानी, अभियंता ऋतुराज यादव, प्रणव खोत आणि स्वच्छता अधिकारी सिद्धांत ठोकळे व संबंधित तांत्रिक कर्मचारी उपस्थित होते.