नांदेड:- परिक्षेत्रात चालणाऱ्या अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी, पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी, आपल्या अधिपत्याखालील पथकाची नांदेड जिल्हयात रवानगी केली होती.
दिनांक 18/04/2026 रोजी, सदर पथकाने, अर्धापूर मधील उमर कॉलनीत असणाऱ्या मोकळ्या जागेत जुगार खेळणाऱ्या इसमांवर धाड टाकली असता, पथकाची चाहूल लागल्याने अनेक जुगारी पळून गेले. मात्र, त्यातील चार जुगारी पथकाच्या हाती लागले असून, त्यांच्याकडून 10,300/- रुपयांची रोकड, जुगाराचे साहित्य व (12) मोटार सायकली असा एकूण 6,60,300/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपींविरुद्ध अर्धापूर पोलीस ठाणे येथे गुरनं 207/2026 कलम 12 (अ), महाराष्ट्र जुगार कायद्याअन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, प्रकरणाचा पुढील तपास अर्धापूर पोलीस ठाण्यातील पोहेकॉ/ बोदेमवाड यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
सदर कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांचेसह पोहेकॉ/ प्रदिप खानसोळे, पोहेकॉ/संजीव जिंकलवाड, पोकॉ/ गणेश धुमाळ व पोकॉ/ कामाजी गवळी यांनी सहभाग घेतला. पथकाच्या उल्लेखनीय कामगिरीबाबत पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी पथकातील अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन करून त्यांना प्रोत्साहित केले आहे.
*'खबर' हेल्पलाइन वरून माहिती द्या :* परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी, पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाने 'खबर' नावाची हेल्पलाइन सुरू केली असून, नागरिकांनी आपल्या भागात चालणाऱ्या अवैध व्यवसायांची माहिती 91 50 100 100 हा मोबाईल क्रमांक असलेल्या 'खबर' या हेल्पलाइन वर फोन करून अथवा व्हाट्सअप मेसेज द्वारे द्यावी, असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी केले आहे.