नांदेड :- अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर संभाव्य बालविवाह रोखण्यासाठी नांदेड जिल्हा प्रशासनाने विशेष सतर्कता बाळगली असून सर्व विभागांना आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले आहेत.
बालविवाह प्रतिबंधासाठी जिल्ह्यात वेळोवेळी जनजागृती व प्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यात आले आहेत. तसेच सामूहिक विवाह सोहळ्यांदरम्यानही महिला व बाल विकास विभागाच्या सतर्कतेमुळे अनेक संभाव्य बालविवाह रोखण्यात यश आले आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
19 एप्रिल 2026 रोजी अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मानला जातो. या काळात बालविवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोणताही बालविवाह घडू नये यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने दक्ष राहावे, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी निर्गमित केले आहेत.
बालविवाहाची माहिती मिळाल्यास तात्काळ ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका किंवा चाइल्ड हेल्पलाइन 1098 वर संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.