वायुवेग पथकाची वर्षभरातील कारवाई
सांगली, दि. ३१,
सांगली जिल्ह्यातील वाहनांना नियमबाह्य तेजस्वी एलईडी बल्ब बसवल्याप्रकरणी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वायुवेग पथकाने गेल्या वर्षभरात 1044 वाहनांवर केलेल्या कारवाईत एकूण 4 लाख 56 हजार 200 रुपये दंडाची आकारणी करण्यात आल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, मोटार वाहन कायद्यानुसार प्रमाणित प्रकाशयंत्रणाच वापरणे बंधनकारक आहे. मात्र, नियमबाह्य पद्धतीने वाहनांना अतिशय तेजस्वी एलईडी बल्ब बसवल्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनचालकांचे डोळे दिपून काही काळ दृश्य अस्पष्ट होते. त्यामुळे वाहनांवर नियंत्रण सुटण्याची शक्यता वाढून अपघात होण्याचा धोका निर्माण होत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी रस्ते सुरक्षिततेस गंभीर धोका निर्माण होत असून पादचारी व दुचाकीस्वारांच्या जीवितालाही धोका निर्माण होत आहे. या पार्श्वभूमिवर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील वायुवेग पथकाकडून तीव्र-स्वरुपात कारवाई सुरु करण्यात आलेली आहे. माहे एप्रिल २०२५ ते माहे फेब्रुवारी २०२६ या कालावधीमध्ये कार्यालयातील वायुवेग पथकामार्फत एकूण ९३९ इतक्या वाहनांवर कारवाई करून 4 लाख 1 हजार 700 रूपये दंडाची आकारणी केली होती. तसेच माहे मार्च २०२६ मध्ये वाहनांना तेजस्वी एलईडी बल्ब बसवल्याबाबत एकूण १०५ इतक्या वाहनांवर कारवाई करून 54 हजार 500 रूपये दंडाची आकारणी केली आहे.
सांगली जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांनी नियमबाह्य पद्धतीने वाहनांना अतिशय तेजस्वी एलईडी बल्ब बसविण्यात येवू नयेत, अथवा बसविण्यात आलेले नियमबाह्य तेजस्वी एलईडी बल्ब वाहनातून काढण्यात यावे जेणे करून इतर वाहनधारकांच्या जीवास धोका निर्माण होणार नाही. असे न केल्यास संबंधित वाहन धारकांना दंडास सामोरे जावे लागेल, याची नोंद घेण्यात यावी, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.