नांदेड :- राज्य शासनातर्फे दरवर्षी कृषीक्षेत्रात संघटनात्मक कार्य करणाऱ्या व्यक्ती, गट/संस्थेला पुरस्कार देण्यात येतो. उल्लेखनिय/अतिउल्लेखनिय कार्य करणारे तसेच राज्याला, जिल्ह्याला दिशादर्शक ठरणारे शेतकरी, व्यक्ती, संस्था, गट यांना पुरस्कार प्रदान करण्यात येतो. विविध कृषि पुरस्कारासाठी जिल्हास्तर समितीकडे अर्ज सादर करण्यास बुधवार 15 एप्रिल 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आयुक्त कृषी यांनी इच्छुक शेतकरी, व्यक्ती, संस्था, गट यांना सन 2025 पासूनचे विविध कृषी पुरस्कार बाबतचे अर्ज ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे सादर करणेबाबत आवाहन केले आहे. तरी इच्छुक शेतकऱ्यांनी तात्काळ आपला अर्ज ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे सादर करावा. अधिक माहितीसाठी उपविभागीय कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांच्या कार्यालाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.
शेतकऱ्यांना पुरस्कारासाठी आवश्यक असलेला जिल्हा पोलीस अधिक्षक यांचेकडील चारित्र्य पडताळणी दाखला प्राप्त करून घेण्यास 15-20 दिवसांचा कालावधी आवश्यक आहे. त्याबरोबर नेटवर्क, तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांना विहित मुदतीत अर्ज सादर करण्यास अडचण येत आहे. मार्च महिन्यात आर्थिक वर्षाच्या अनुषंगाने कामकाज असल्याने क्षेत्रीय यंत्रणाना प्रत्यक्ष पडताळणीसाठी देखील कालावधी आवश्यक आहे. त्यामुळे शेतकरी व क्षेत्रीय स्तरावरून दूरध्वनीद्वारे सदरची मुदत वाढवून मिळण्याबाबत विनंती करण्यात आली होती. त्याअनुषंगाने सन 2025 करीता विविध कृषी पुरस्कार सादर करण्यासाठी सुधारीत नियोजन पुढील प्रमाणे करण्यात आले आहे.
*सन 2025 च्या सर्व पुरस्कारांसाठी सुधारित कालावधी*
अर्जदाराने ऑनलाईन अर्ज भरणे. सहाय्यक कृषी अधिकारी यांनी अर्जदाराचा ऑनलाईन अर्जाची छाननी करून, समक्ष भेट देऊन अनुषंगिक बाबींची पूर्ततेची कार्यवाही करून तालुका कृषी अधिकारी यांचेकडे अर्ज सादर करणे. तालुका कृषी अधिकारी यांनी अर्जदाराचा ऑनलाईन अर्ज छाननी, समक्ष भेट, सहाय्यक कृषी अधिकारी यांचे अभिप्राय यांची प्रत्यक्ष पडताळणी करून जिल्हास्तर समितीकडे अर्ज सादर करण्याचा कालावधी आता बुधवार 15 एप्रिल 2026 पर्यंत राहील.
जिल्हास्तर समितीने प्राप्त प्रस्तावांची छाननी करून, समक्ष भेट देऊन उल्लेखनीय कार्याबाबतच्या स्वयंस्पष्ट अभिप्रायासह शिफारशीसह अर्ज विभागस्तरीय समितीकडे सादर करण्याची मुदत गुरूवार 30 एप्रिल 2026 असेल.
तर विभागस्तरीय समितीने प्राप्त प्रस्तावांची छाननी करून, समक्ष भेट देऊन उल्लेखनीय कार्याबाबतच्या स्वयंस्पष्ट अभिप्रायासह शिफारस केलेले परिपूर्ण, निकषाप्रमाणे पात्र प्रस्ताव विभागस्तरीय समितीच्या बैठकीच्या इतिवृत्तासह कृषी आयुक्तालयास सादर करण्याची मुदत शुक्रवार 15 मे 2026 पर्यंत राहील.
महाराष्ट्र राज्य हे कृषी उत्पादन व कृषी उद्योग क्षेत्रात अग्रेसर राज्य म्हणून ओळखले जाते. राज्यात दरवर्षी शेती, फलोत्पादन व पुरक क्षेत्रात अतिउल्लेखनिय कार्य करणाऱ्या महिला शेतकरी तसेच पुरुष शेतकरी अथवा संस्थेस कृषी विभागामार्फत डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषीभुषण पुरस्कार, जिजामाता कृषीभुषण पुरस्कार, कृषीभुषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार, उद्यानपंडीत पुरस्कार, युवा शेतकरी पुरस्कार व वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार इत्यादी पुरस्कार मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांचे शुभहस्ते प्रदान करुन सन्मानित करण्यात येते.
यापूर्वी विविध कृषी पुरस्कारांचे प्रस्ताव चार प्रतींमध्ये ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येत होते. प्रस्ताव बनविण्यासाठी खर्च येत असल्याने सर्व इच्छुक शेतकरी अर्ज करू शकत नव्हते. या पारंपारिक पद्धतीमुळे प्रस्ताव सादरीकरण, पडताळणी व संकलनासाठी अधिक कालावधी लागत होता. या पार्श्वभूमीवर पुरस्कार प्रस्तावांची प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक व प्रभावी करण्याच्या दृष्टीने कृषी विभागामार्फत पुरस्कार प्रस्ताव ऑनलाईन स्वरूपात स्वीकारण्यासाठी स्वतंत्र संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. सदर प्रणाली कृषी विभागाच्या संकेतस्थळावर https://krishi.maharashtra.gov.in कृषी पुरस्कार टॅबमध्ये उपलब्ध आहे.
सदर संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून पुरस्कार प्रस्ताव सादरीकरण, तपासणी, मूल्यांकन तसेच अहवाल निर्मिती ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल स्वरूपात राबविणे शक्य होणार आहे. यामुळे मानवी हस्तक्षेप कमी होऊन पारदर्शकता वाढणार असून पुरस्कार प्रक्रियेची कार्यक्षमता, विश्वासार्हता व परिणामकारकता अधिक बळकट होणार आहे.