नांदेड :- दिनांक 16 ते 31 मार्च, 2026 दरम्यान, पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी नांदेड परिक्षेत्रात गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविरुद्ध व्यापक मोहीम उघडली आहे. सदर मोहिमेच्या अनुषंगाने पथकास एका महिंद्रा कंपनीच्या बोलेरोमधून गुटखा उदगीरकडे घेवून जाणार असल्याची माहिती मिळाली होती.
दिनांक 30.03.2026 रोजी पोलीस ठाणे वाढवणा हद्दीत, उदगीर-अहमदपुर रोडवरील वाढवणा पाटीजवळ सदरची बोलेरो थांबवली असता, सदर वाहनात अवैधरित्या विक्री करण्यासाठी घेवून जात असलेला 2,49,600/- रुपयांचा गुटखा व एक महिंद्रा कंपनीची बोलेरो असा एकूण 8,12,000/-रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी आरोपी रसूल इब्राहिम शेख, वय 41 वर्ष, रा. भाग्यनगर, ता. अहमदपुर जि. लातूर व राजू गुरुलींग हामणे, रा. भाग्यनगर, ता. अहमदपुर, जि. लातूर यांच्याविरुद्ध वाढवणा पोलीस ठाणे येथे गुरनं 81/2026 कलम 123, 62, 223, 274, 275, 3(5), भारतीय न्याय संहिता सह कलम 59 अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हयाचा तपास पोलीस ठाणे वाढवणा येथील सपोनि सुनिल गायकवाड हे करीत आहेत.
सदर मोहिमेदरम्यान, स्वादिष्ट/सुगंधित तंबाखू, अपमित्रके युक्त चघळण्याची तंबाखू, स्वादिष्ट/सुगंधित सुपारी, गुटखा, पान मसाला, खर्रा, मावा व तत्सम पदार्थांची साठवण, वितरण व वाहतूक याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 123 अन्वये कारवाई करण्यात येत आहे.
उपरोक्त पदार्थांच्या संदर्भात, संबंधिताविरुद्ध कलम 123 बी.एन.एस. अन्वये करण्यात आलेल्या कारवाईचा खटला हा सत्र न्यायालयात चालणारा असून त्यास दहा पर्यंतच्या कारावासासह द्रव्य दंडाची देखील शिक्षा आहे.
' खबर ' हेल्पलाइन चा वापर करा अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांकडे पोहोचाविता यावी,
या दृष्टिकोनातून, पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाने 91 50 100 100 हा मोबाईल क्रमांक असलेली 'खबर' नावाची हेल्पलाइन सुरू केली असून, नागरिकांनी आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती, सदर क्रमांकावर फोन करून अथवा व्हाट्सअप मेसेज द्वारे पाठवावी, असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी केले आहे.