नांदेड :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात सात दिवसीय “प्रगत आण्विक जीवशास्त्र” प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन आज दि.२३ मार्च, २०२६ रोजी जैविकशास्त्र संकुलात संपन्न झाले. यावेळी, यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रगत तंत्रज्ञान आत्मसात करून अद्ययावत राहणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांनी व्यक्त केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (भारत सरकार) तसेच हाय मीडिया लॅबोरेटोरिज, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सूक्ष्मजीवशास्त्र व जैवतंत्रज्ञान द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी हे सात दिवसीय प्रशिक्षण शिबिर २३ ते ३० मार्च, २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांच्या हस्ते झाले.
यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात प्रगत तंत्रज्ञानाची भर पडावी व त्यांनी आधुनिक संशोधन तंत्र आत्मसात करावे या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या विषयातील नवनवीन तंत्रज्ञान आणि कौशल्य आत्मसात करणे आवश्यक असल्याचे सांगितले. जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास महत्त्वाचा असून आधुनिक संशोधन तंत्रज्ञानाचे ज्ञान असल्यास विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील आव्हाने समर्थपणे पेलता येतील, असेही त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून हाय मीडिया लॅबोरेटोरिज, मुंबई येथील मनोजकुमार बोरसे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर जैविकशास्त्र संकुलाचे संचालक व शिबिर संयोजक डॉ. बी. एस. सुरवसे तसेच सहसंयोजक डॉ. ए. पी. पाठक उपस्थित होते.
या प्रशिक्षण शिबिरामध्ये पेशीमधून शुद्ध डीएनए वेगळा करणे, डीएनएमध्ये अचूक बदल करणे, डीएनए परिवर्तन, डीएनएच्या अनेक प्रती तयार करणे, एसडीएस-पेजद्वारे प्रथिनांचे विभाजन, आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफी, अफिनिटी क्रोमॅटोग्राफी तसेच सदर्न ब्लॉटिंग यांसारख्या विविध प्रगत आण्विक तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बी. एस. सुरवसे यांनी केले. सूत्रसंचालन प्रतिभा ढवळे यांनी केले तर आभार प्रदर्शन समरीन पठाण यांनी केले.
हे प्रशिक्षण शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ. हेमलता भोसले, आयोजन सचिव डॉ. उमेश धुलधज, प्रतिभा ढवळे, डॉ. सुनील हजारे तसेच डॉ. मिलिंद गायकवाड, विद्या सुकरे, प्राजक्ता चांडोळकर, रुबिया शेख, गोविंद सूर्यवंशी, वसुधा कोडगिरे, खाजा मोईनुद्दीन, राजू शेरे, सुशील खरवडकर आणि राजकुमार हस्सेकर प्रयत्न करीत आहेत.