नांदेड :- पाणी व स्वच्छता विभागातील तालुकास्तरावर कार्यरत गट समन्वयक व तालुका समन्वयक यांचे डिसेंबर 2025 पासून मानधन थकित असल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले असून उपासमारीची वेळ आली आहे. आर्थिक वर्ष संपत आले तरी अद्याप वेतन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
यापूर्वीही जिल्हास्तरावरील कर्मचाऱ्यांना वेतन न मिळाल्यामुळे मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन करावे लागले होते. आता पुन्हा तालुकास्तरावरील कर्मचाऱ्यांचीही तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या चार महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने दैनंदिन खर्च भागविणे कठीण झाले आहे.
सदर कर्मचारी घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, सार्वजनिक व वैयक्तिक शौचालय उभारणी, गावे मॉडेल बनविणे, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, स्वच्छतेबाबत जनजागृती तसेच जल जीवन मिशन अंतर्गत विविध कामे प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. गाव, तालुका व जिल्हा स्तरावर पाणी व स्वच्छता व्यवस्थापनात हे कर्मचारी महत्त्वाचा दुवा म्हणून काम करतात.
महागाईच्या पार्श्वभूमीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण, घरभाडे, वैद्यकीय खर्च भागविणे कठीण झाले आहे. विशेष म्हणजे अनेक कर्मचारी गेली 10 ते 15 वर्षे सेवेत असूनही त्यांना नोकरीची शाश्वती नाही आणि मानधनही वेळेवर मिळत नाही. या पार्श्वभूमीवर सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी राज्य शासन, संबंधित मंत्री, आमदार व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तातडीने थकित मानधन देण्याची मागणी केली आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या या कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने लवकरात लवकर निधी उपलब्ध करून द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.