आमदार सुनील प्रभूंचा घणाघात : बनावट डिग्री घोटाळ्यावर सरकार कोंडीत

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 20/03/2026 9:59 AM




• १२ वर्षे ‘दहावी पास’ व्यक्ती दुय्यम अभियंता; महापालिकेला कोट्यवधींचा फटका

• बनावट प्रमाणपत्रांवर नोकरी; प्रशासनातील संगनमताचा संशय
• तात्काळ बडतर्फी व गुन्हा दाखल करा – प्रभूंची मागणी       

 मुंबई | प्रतिनिधी

मुंबई महापालिकेच्या भरती प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा बनावट डिप्लोमा-डिग्री घोटाळा अखेर विधानसभेत गाजला. शिवसेना नेते, माजी महापौर आणि आमदार सुनील प्रभू यांनी हा मुद्दा आक्रमकपणे उपस्थित करत प्रशासनाला धारेवर धरले.
धर्मराज उत्तम दावणे या व्यक्तीने केवळ दहावीपर्यंत शिक्षण घेतले असतानाही बनावट डिप्लोमा व डिग्री प्रमाणपत्रांच्या आधारे २०१३ साली महापालिकेत दुय्यम अभियंता पद मिळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तब्बल १२ वर्षे विविध विभागांत काम करत त्यांनी पगार, भत्ते आणि शासकीय सुविधांचा लाभ घेतल्याने महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा आर्थिक फटका बसल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या संबंधित अधिकारी एम-पूर्व वार्ड (गोवंडी) येथून धोबीतलाव, सीएसटी येथील कार्यालयात कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणामुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे, २०१३ सालीच संबंधित अधिकाऱ्याच्या बनावट प्रमाणपत्रांबाबत वरिष्ठांना माहिती मिळाल्याचा दावा केला जात आहे. मात्र, त्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने प्रशासनातील संगनमताचा संशय अधिक गडद झाला आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार सुनील प्रभू यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडत संबंधित अधिकाऱ्याला तात्काळ सेवेतून बडतर्फ करून त्याच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची ठाम मागणी केली. तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशीही मागणी त्यांनी केली.
दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित विभागाला तातडीने कारवाईचे निर्देश दिल्याची माहिती आहे.
या घोटाळ्यामुळे महापालिकेच्या भरती प्रक्रियेतील पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी मिळवणाऱ्या इतर प्रकरणांचाही भंडाफोड होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या