‘स्वारातीम’ विद्यापीठाची २६ वर्षांनंतर सुवर्णझेप; राष्ट्रीय युवक महोत्सवात ऐतिहासिक यश

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 17/03/2026 6:20 PM

नांदेड :- चेन्नई येथे पार पडलेल्या राष्ट्रीय युवक महोत्सवात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने तब्बल २६ वर्षांनंतर ऐतिहासिक यश संपादन केले आहे. देशातील आठ झोनमधील १४२ नामांकित विद्यापीठांमध्ये झालेल्या चुरशीच्या स्पर्धेत विद्यापीठाने लोक/आदिवासी नृत्य प्रकारात प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक मिळवले.
या स्पर्धेत विद्यापीठाने सहभाग घेतलेल्या सर्व सात कलाप्रकारांत पारितोषिके मिळवत १०० टक्के यशाची नोंद केली. यात लोक/आदिवासी नृत्य (दंडार नृत्य) आणि रॅली/मिरवणूक या प्रकारांत प्रथम क्रमांक, माईम (मूक अभिनय), लोक वाद्यवृंद, शास्त्रीय वाद्य एकल आणि लघुनाटिका (स्किट) या प्रकारांत द्वितीय क्रमांक, तर संकल्पना नृत्य प्रकारात पाचवा क्रमांक मिळाला.
या उल्लेखनीय यशामुळे विद्यापीठाचा संघ आता आंतरराष्ट्रीय युवक महोत्सवात भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पात्र ठरला आहे. विशेष म्हणजे, २६ वर्षांपूर्वी लोकनृत्यात मिळवलेल्या सुवर्णयशाची परंपरा नव्या पिढीने पुन्हा जिवंत केली आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजपालसिंह चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली संघाने अल्पावधीत मोठे आव्हान पेलत हे यश मिळवले. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. डी. डी. पवार, वित्त व लेखाधिकारी डॉ. राजेश शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंह साबळे, अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, डॉ. चंद्रकांत बाविस्कर, आय.आय.एल.चे संचालक डॉ. शैलेश वाढेर, ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक डॉ. जगदीश कुलकर्णी, एन.एन.एस.चे संचालक डॉ. मारोती गायकवाड, आय.क्यू.ए.सी.चे संचालक डॉ. सुरेन्द्रनाथ रेड्डी, कार्यकारी अभियंता तानाजी हुस्सेकर, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम आदी मान्यवरांनी संघाचे कौतुक केले.
संघाचे व्यवस्थापन डॉ. संदीप काळे व सिद्धार्थ नागठाणकर यांनी सांभाळले. लोकनृत्यासाठी संदेश हटकर, तर रॅली व लघुनाटिकेसाठी दिग्दर्शक दिलीप डोम्बे यांनी प्रशिक्षण दिले. डॉ. शिवराज शिंदे यांनी लोकसंगीतासाठी मार्गदर्शन केले. तसेच संकेत गाडेकर आणि संभा कांबळे यांनीही यशासाठी विशेष योगदान दिले.
या अभूतपूर्व यशामुळे संपूर्ण मराठवाड्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद, अधिसभा सदस्य, विद्यार्थी विकास मंडळ यासह विद्यापीठ परिसरातील संचालक, प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी तसेच विविध स्तरांतून विजेत्या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शकांचे अभिनंदन होत आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या