नांदेड : नांदेड ग्रंथोत्सव २०२५ दि. १४ व १५ मार्च रोजी उत्साहात पार पडला. साहित्यिक कार्यक्रमांच्या मेजवानीसोबतच पुस्तकांच्या स्टॉल्समुळे वाचकांना मोठा लाभ मिळाला. या ग्रंथोत्सवात वाचकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विक्रमी खरेदी केली असून सुमारे दहा लाख रुपयांची ग्रंथविक्री झाल्याची नोंद झाली.
वाचक व ग्रंथालय चालकांना आवश्यक पुस्तके सहज उपलब्ध व्हावीत, या उद्देशाने विविध प्रकाशनांचे व पुस्तक विक्रेत्यांचे स्टॉल मोठ्या प्रमाणावर उभारण्यात आले होते. यामध्ये छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय प्रकाशन, शांती पब्लिकेशन (पुणे), जिल्हाधिकारी कार्यालय नांदेडचा ग्रंथप्रदर्शन स्टॉल, संकेत प्रकाशन, निर्मल प्रकाशन (नांदेड), संदेश बुक डेपो (परभणी), प्रगती बुक डेपो (हिंगोली), मांडणीकर बुक डेपो (नांदेड), मराठवाडा बुक सेलर (नांदेड), ओमकार प्रकाशन (नांदेड व हिंगोली) आदींचा समावेश होता.
ग्रंथप्रदर्शन व विक्री स्टॉलचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, नांदेड महापालिकेच्या महापौर कविता मुळे, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, डॉ. मा. मा. जाधव, प्रा. संजय जगताप, साहित्यिक डॉ. विलास वैद्य, नारायण शिंदे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रकाशकांनी दर्जेदार व विविध विषयांवरील ग्रंथ उपलब्ध करून दिल्यामुळे वाचक व ग्रंथालय चालकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ग्रंथोत्सवात दोन दिवसांत सुमारे १० लाख रुपयांची विक्रमी विक्री झाल्याची नोंद झाली.