बालसाहित्याकडे गांभीर्याने बघितले पाहिजे - कवी दासू वैद्य यांचे प्रतिपादन

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 14/03/2026 7:55 PM

नांदेड :- ‘गीतलेखन किंवा बालसाहित्याकडे आपल्याकडे खूप नकारात्मक पद्धतीने बघितले जाते. मुळात बालसाहित्य लिहायलाच लोक घाबरतात. त्याचं कारण म्हणजे खूप जणांना असं वाटतं की, आपल्यावर बालसाहित्यिक म्हणून ठप्पा पडेल. त्यामुळे बालसाहित्य दुर्लक्षित रराहिलं आहे. जसं प्राथमिक शिक्षण दुर्लक्षित आहे आणि सारे फक्त उच्चशिक्षणाचाच जयघोष करत बसतात आणि आपला पायाच कच्चा असतो. उद्याचे मराठी वाचक कोण आहेत, हा फार गंभीर प्रश्न आहे. आपण जर उत्तम बालसाहित्याची निर्मिती केली नाही, तर उद्याचे चांगले वाचक घडणार नाहीत. म्हणून बालसाहित्याकडे अत्यंत गांभीर्याने बघितलं पाहिजे’ असे प्रतिपादन प्रख्यात कवी, गीतकार दासू वैद्य यांनी केले. 
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भाषा संकुलाच्या वतीने कौशल्य विकास उपक्रमांतर्गत डॉ. पी. विठ्ठल यांनी त्यांच्याशी हृद्य संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. या प्रदीर्घ संवादात दासू वैद्य यांनी स्वत:च्या साहित्यिक जडणघडणीविषयी दिलखुलास भाष्य केले. माझ्या आयुष्यात मुदखेड, अंबाजोगाई आणि नांदेड या गावातील सांस्कृतिक आणि शैक्षणिक पर्यावरणाचा खूप मोठा प्रभाव आहे. तसेच कवी असणं ही गोष्ट मला अधिक प्रिय आहे, सध्या जगात युद्ध सुरु आहे. माणसाला माणूस म्हणून मागे नेणारं हे राजकारण असून सर्वसामान्य माणूस पोटार्थी असतो. त्याच्या जगण्याचे प्रश्न वेगळे असतात. असेही ते म्हणाले.
प्रारंभी भाषा संकुलाचे संचालक डॉ. पृथ्वीराज तौर यांनी दासू वैद्य यांचे स्वागत करुन प्रास्ताविक केले. डॉ. वैजनाथ अनमुलवाड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी डॉ. शत्रुघ्न जाधव, डॉ. नीना गोगटे, विंनायक येवले यांच्यासह विद्यार्थी आणि प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या