अहिल्यानगर, दि. ५ : - सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांच्या महसूल विषयक तक्रारी व प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यात मार्च ते मे २०२६ या कालावधीत 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा क्रमांक १' राबविण्यात येणार आहे. महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करणे तसेच डिजिटल सेवा सक्षमपणे उपलब्ध करून देणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे,अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या १८ फेब्रुवारी २०२६ च्या शासन निर्णयानुसार राज्यभर हे अभियान राबविण्यात येत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात महसूल मंडळ स्तरावर ७ व १४ मार्च २०२६ तसेच १० व १७ एप्रिल २०२६ रोजी या शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. नगरपरिषद व नगरपंचायत स्तरावर ८ व १५ मे २०२६ रोजी शिबिरे पार पडतील. पहिल्या टप्प्यात ७ मार्च रोजी अहिल्यानगर, नेवासा, श्रीगोंदा, पारनेर, पाथर्डी, शेवगाव, कर्जत, जामखेड, संगमनेर, अकोले, श्रीरामपूर, राहुरी, राहता व कोपरगाव या तालुक्यातील विविध मंडळ विभागांमध्ये शिबिरे होणार आहेत.
या शिबिरांमध्ये प्रलंबित फेरफार प्रकरणे निकाली काढणे, सातबारा व आठ-अ उताऱ्यांची दुरुस्ती, डिजिटल सातबारा वितरण, तसेच उत्पन्न, रहिवासी, जात व नॉन-क्रीमीलेयर प्रमाणपत्रे वितरीत केली जातील. यासोबतच एक खिडकी योजना, ई-मोजणी, ई-फेरफार, अॅग्रीस्टॅक, पीएम किसान संदर्भातील सेवा, भूसंपादन व अकृषक परवानगी प्रकरणी गाव दप्तर अद्ययावत करणे, विद्यार्थ्यांना विविध दाखले देणे, तुकडेबंदी कायद्यांतर्गत प्रकरणांचे परीक्षण व सामाजिक अर्थसहाय्य योजनांतील मंजुरी आदेशांचे वितरण केले जाणार आहे. तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील नवीन तरतुदी, अकृषक रूपांतरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांची स्वतंत्र परवानगी आवश्यक नसल्याची बाब, सनद प्रणाली संपुष्टात आल्याची माहिती, एकवेळ अधिमूल्य भरणा प्रणाली व महाभूमी पोर्टलवरील डिजिटल सातबाराला असलेल्या कायदेशीर वैधतेबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी यांना समन्वयाचे निर्देश दिले आहेत. याकामी लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत पदाधिकारी, महिला बचत गट, स्वयंसेवी संस्था व माध्यम प्रतिनिधींनी सक्रिय सहभाग नोंदवावा.
जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपल्या महसूल विषयक प्रकरणांसह व संबंधित कागदपत्रांसह या नियोजित शिबिरात उपस्थित राहून शासनाच्या या लोकाभिमुख उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
#MaharajswaSamyadhan #CollectorAhilyanagar #RevenueAbhiyan2026 #SarkarAplyaDari #AhilyanagarAdministration #DigitalSatbara #FarmerWelfare #CitizenServices #GoodGovernance #MaharashtraRevenue #MahaBhumi #JanSeva #AdministrativeEfficiency #AhilyanagarNews #महाराजस्व_समाधान_शिबीर #अहिल्यानगर_प्रशासन #लोकशाही_प्रशासन #महसूल_विभाग #शेतकरी_सुविधा #छत्रपती_शिवाजी_महाराज_अभियान