स्वारातीम विद्यापीठामध्ये ‘विकसित भारत युवा संसद २०२६’ चे आयोजन

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 02/03/2026 5:31 PM

नांदेड :- भारत सरकारच्या युवा कार्य व क्रीडा मंत्रालय यांच्या वतीने आयोजित ‘विकसित भारत युवा संसद कार्यक्रम–२०२६’ अंतर्गत जिल्हास्तरीय युवा संसद वक्तृत्व स्पर्धा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व नांदेड येथील माय भारत युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होणार आहे. हा वक्तृत्व स्पर्धेचा कार्यक्रम दि. ५ मार्च, २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर असणार असून उद्घाटन नांदेड येथील माय भारत जिल्हा युवा अधिकारी श्रीमती चंद्रकला रावळकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन आणि कुलसचिव डॉ. डी. डी. पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. युवासंसद नोडल अधिकारी डॉ. केशव आलगुले, रासेयो जिल्हा समन्वयक डॉ. भागवत पस्तापुरे तसेच व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिसभा सदस्य व संवैधानिक अधिकारी यांचीही विशेष उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. मारोती गायकवाड यांनी दिली.
देशातील १८ ते २५ वयोगटातील युवकांचे विचार जाणून घेणे, त्यांना सामाजिक व राष्ट्रीय प्रश्नांबाबत सजग करणे, निर्णयक्षमता विकसित करणे आणि लोकशाही मूल्यांविषयी आदर निर्माण करणे या उद्देशाने देशातील ७२८ जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय युवा संसद स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
नांदेड जिल्ह्यातील १३१ स्वयंसेवकांनी 'माय भारत' पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी केली असून ते या वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होणार आहेत. स्पर्धेचा विषय “आणिबाणी नंतरची पन्नास वर्षे : भारतीय लोकशाहीसाठी धडा” (50 Years of Emergency: Lessons for Indian Democracy) असा आहे. या विषयावर युवक आपली मते मांडणार असून लोकशाही प्रक्रियेबाबत सजग, विचारशील आणि जबाबदार पिढी घडविण्याचा हा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या