स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठच्या शिरपेचात मानाचा तुरा;२० फार्मसी विद्यार्थ्यांची मॅक्लेओड्स फार्मास्युटिकल्समध्ये निवड

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 02/03/2026 5:29 PM

नांदेड :- औषधनिर्माण (फार्मसी) क्षेत्रातील वाढती मागणी आणि उद्योगक्षेत्राशी सुसंगत शिक्षण यांची प्रभावी सांगड घालत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने रोजगारनिर्मितीच्या दिशेने आणखी एक उल्लेखनीय पाऊल टाकले आहे. विद्यापीठाच्या प्रशिक्षण व प्लेसमेंट विभाग आणि औषधनिर्माणशास्त्र संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये औषधनिर्मिती क्षेत्रातील नामांकित कंपनी मॅक्लेओड्स फार्मास्युटिकल्सने २० विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड केली.
हा यशस्वी उपक्रम कुलगुरू डॉ. मनोहर चासकर आणि प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. बी.फार्म आणि एम.फार्म अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी ही विशेष भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. दिवसभर चाललेल्या मुलाखतीनंतर पात्र ठरलेल्या २० विद्यार्थ्यांना त्याच दिवशी कंपनीच्या वतीने ऑफर लेटर प्रदान करण्यात आले.
विद्यार्थ्यांना नामांकित औषधनिर्माण कंपनीत करिअरची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी डॉ. बालाजी मुधोळकर, औषधनिर्माणशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. संजय पेकमवार आणि प्लेसमेंट ड्राईव्हचे समन्वयक डॉ. शशिकांत ढवळे यांनी विशेष पुढाकार घेतला. प्लेसमेंट टीममधील वैशाली शेळके, वर्षा कदम तसेच उपस्थित विद्यार्थ्यांनीही या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत कुलगुरू डॉ. मनोहर चासकर आणि प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांनी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या यशामुळे औषधनिर्माणशास्त्र संकुलाच्या शैक्षणिक गुणवत्तेचा आणि उद्योगाभिमुख शिक्षण पद्धतीचा पुन्हा एकदा प्रत्यय आला असून विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या निवडीमुळे संकुलात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून भविष्यातही अशा प्रकारच्या उद्योग-संलग्न उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याचा विद्यापीठाचा मानस आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या