अहिल्यानगर (प्रतिनिधी) – स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून नागरिकांना नेवासा परिसरात बोलावून दरोडा टाकणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. आरोपींकडून 6,65,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यामध्ये गावठी कट्टा, जिवंत काडतुसे, मोबाईल व रोख रक्कम यांचा समावेश आहे.
फिर्यादी अरविंद सिद्धप्पा हलसांगी (रा. गणेशनगर, वाघोली, जि. पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक 25 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास शेखर उर्फ बंट्टी संजय पाडळे (रा. देवगाव, ता. नेवासा) याने विश्वास संपादन करून स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर नेवासा–श्रीरामपूर मार्गावरील हॉटेल शिवमजवळील कांद्याच्या चाळीत फिर्यादी व त्यांच्या मित्रांना बोलावून काठी, धारदार शस्त्र व पिस्तुलचा धाक दाखवत मारहाण करून रोख रक्कम, ऍपल कंपनीचा मोबाईल, दोन विवो मोबाईल व दोन सोन्याच्या अंगठ्या असा एकूण 15,65,000 रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने हिसकावून नेला.
या प्रकरणी नेवासा पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 163/2026 भारतीय न्याय संहिता 2023 कलम 310(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर चे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले.
गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार 28 फेब्रुवारी 2026 रोजी नेवासा–छत्रपती संभाजीनगर मार्गावरील माळी चिंचोरा फाटा परिसरात सापळा रचून शेखर उर्फ बंट्टी संजय पाडळे (वय 32) व किरण बंडू काळे (वय 29, रा. नागफणीवस्ती, नेवासा) यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी भाऊसाहेब भोसले, सचिन उर्फ गटण्या पवार व इतर 8–9 साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली.
जप्त मुद्देमाल
आरोपींकडून पुढील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे –
35,000 रु. किंमतीचा गावठी कट्टा (अग्निशस्त्र)
दोन जिवंत काडतुसे
30,000 रु. किंमतीचा मोबाईल
6,00,000 रु. रोख रक्कम
एकूण: 6,65,000 रुपये
आरोपींचा गुन्हेगारी इतिहास
आरोपी किरण बंडू काळे याच्याविरुद्ध यापूर्वी नेवासा, राहाता, कोपरगाव तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खून, दरोडा, घरफोडी, आर्म अॅक्ट व मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सदर आरोपींना पुढील तपासासाठी नेवासा पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
#अहिल्यानगर_पोलीस #दरोडा #नेवासा #स्थानिक_गुन्हे_शाखा #CrimeNews #GoldFraud #PoliceAction