नांदेड :- पुणे येथील समाज कल्याण आयुक्त तथा लातूर येथील प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत नांदेड जिल्ह्यातील समाज कल्याण अस्थापनेवरील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन दिनांक १७ जानेवारी २०२६ रोजी सायन्स कॉलेज, स्नेहनगर, नांदेड येथील क्रीडा प्रांगणात करण्यात आले.
या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन सायन्स कॉलेजचे प्राचार्य प्रा. डॉ. लक्ष्मण पी. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे उपस्थित होते. प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत, भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचे सामूहिक वाचन, क्रीडागीत व सहभागी संघांचे पथसंचलन पार पडले.
प्रस्ताविक समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी केले तर उद्घाटनपर मार्गदर्शन प्राचार्य प्रा. डॉ. लक्ष्मण शिंदे यांनी केले. पिपल्स महाविद्यालयाचे ग्रंथपाल संदीप गायकवाड यांनीही खेळाडूंना मार्गदर्शन केले. या स्पर्धेत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, शासकीय वसतिगृहे, शासकीय निवासी शाळा, जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी कार्यालय व समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद नांदेड येथील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये आऊटडोअर प्रकारात क्रिकेट, खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, रस्सीखेच तसेच इनडोअर प्रकारात बॅडमिंटन, टेबल टेनिस व बुद्धिबळ स्पर्धांचा समावेश होता. महिला विभागातील कबड्डी स्पर्धेत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण महिला कर्मचारी संघाने प्रथम क्रमांक पटकावला, तर शासकीय निवासी शाळा व शासकीय वसतिगृह महिला संघाने द्वितीय क्रमांक मिळविला. खो-खो व रस्सीखेच स्पर्धांमध्ये शासकीय निवासी शाळा व शासकीय वसतिगृह महिला संघाने प्रथम क्रमांक मिळविला.
पुरुष विभागात क्रिकेट स्पर्धेत शासकीय वसतिगृह नांदेड संघाने प्रथम क्रमांक पटकावून जिल्हास्तरीय चषक जिंकला, तर द्वितीय क्रमांक सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड संघाने मिळविला. व्हॉलीबॉल स्पर्धेत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड संघ विजेता ठरला, तर खो-खो स्पर्धेत शासकीय निवासी शाळा कर्मचारी संघाने प्रथम क्रमांक पटकावला.
स्पर्धा संपन्न झाल्यानंतर लगेचच बक्षीस वितरण समारंभ पार पडला. पिपल्स महाविद्यालयाचे ग्रंथपाल संदीप गायकवाड, प्रा. विजयानंद कदम व समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका समन्वयक गजानन पांपटवार यांनी केले, तर आभार सहाय्यक लेखाधिकारी संतोष चव्हाण यांनी मानले.
या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडल्या.