कुंभमेळ्यापूर्वीच शिर्डीतील विकासकामे पूर्ण करा - विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम प्रतिनिधी राविराज शिंदे

  • Mr.Ravikumar Shinde (Dhondpargon )
  • Upadted: 17/01/2026 5:55 AM


भाविकांच्या सोयी-सुविधांना सर्वोच्च प्राधान्य

शिर्डी विमानतळ विस्तार, रस्त्यांच्या कामांना गती देण्याचे निर्देश

कुंभमेळा पूर्वतयारी बैठक संपन्न

शिर्डी, दि. १६ : आगामी नाशिक - त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी सुरू असलेली विकासकामे निर्धारित वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. शिर्डी विमानतळ विस्तारीकरण व रस्त्यांच्या कामांचा वेग वाढवून ती कुंभमेळ्यापूर्वीच पूर्ण करावीत. तसेच, गर्दीचे नियोजन करताना प्रशासकीय सोयीपेक्षा भाविकांसाठीच्या सोयी- सुविधांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशा सूचना नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी आज येथे दिल्या.

आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या (२०२६-२७) अनुषंगाने शिर्डी-शिंगणापूर येथील भाविकांच्या गर्दी नियोजनाबाबत साईबाबा मंदिर सभागृहात आयोजित आढावा बैठकीत डॉ. गेडाम बोलत होते. यावेळी कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प.) आनंद भंडारी, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आदी उपस्थित होते.

श्री.गेडाम म्हणाले, शिर्डी विमानतळ विस्तारीकरणाच्या कामांचा वेग वाढविण्यात येऊन पुढील सहा महिन्यांच्या आत कामे पूर्ण करण्यात यावीत. रेल्वे स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी 'कोपरगाव पॅटर्न' राबविण्यात यावा. शिर्डी हे टर्मिनस असल्याने गाड्या वळवण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांना कोपरगावला थांबा देऊन तिथून बसेसद्वारे भाविकांना शिर्डीत आणण्याचे नियोजन करण्यात यावे.
शिर्डी-राहाता बायपासच्या कामाचा दर्जा उत्तम राहील, याची अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी. आपण स्वतः या कामाची व साहित्याची पाहणी करणार असून, त्रुटी आढळल्यास काम पुन्हा करण्यास सांगितले जाईल. नगर-मनमाड महामार्गाचे काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने करावे.

नाशिकमधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी व भाविकांचा वेळ वाचवण्यासाठी 'शिर्डी ते त्र्यंबकेश्वर' थेट बस सेवा सुरू करण्यात यावी. तसेच, जड वाहनांमुळे होणारी कोंडी टाळण्यासाठी मनमाडकडून येणारी वाहने 'येवला - वैजापूर - गंगापूर - नेवासा - अहिल्यानगर' या मार्गाने वळवण्यात यावीत. एस.टी. महामंडळातर्फे पर्वणी काळात दररोज ६८० फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले असल्याचे यावेळी एस.टी महामंडळाचे विभाग नियंत्रक यांनी यावेळी सांगितले.

पार्किंग क्षेत्रातील कचरा उचलण्यासाठी घंटागाड्यांऐवजी ट्रॅक्टरचा वापर करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले. तसेच स्वच्छतेसाठी ५०० अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करण्यात यावेत. पिण्याच्या पाण्यासाठी टँकरऐवजी पाईपलाईनवर भर देण्यात यावा, यासाठी निळवंडे कालव्यावरून पाणी उचलण्याचे नियोजन करावे. अखंडित वीज पुरवठ्यासाठी बाभळेश्वर येथून पर्यायी लाईन टाकण्यात यावी, अशा सूचनाही श्री.गेडाम यांनी दिल्या.

कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी गर्दी नियंत्रणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर भर दिला जाणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, शिर्डीच्या १५ कि.मी. आधीपासून मराठी, हिंदी व इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये दिशादर्शक फलक लावण्यात येतील. पार्किंगच्या उपलब्धतेची माहिती देण्यासाठी 'डिजिटल स्क्रीन्स' उभारण्यात येणार असून, संपूर्ण परिसर सीसीटीव्ही व पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीमने जोडला जाईल. प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी स्पेशल युनिट व अतिरिक्त मनुष्यबळ वापरण्याचे निर्देश देण्यात येणार आहे.

कुंभमेळ्यात मोबाईल नेटवर्क सुरळीत राहण्यासाठी १४ नवीन टॉवर्स व ५ फिरते टॉवर्स उभारण्यात येणार आहेत. तसेच, अग्निशमन सेवेसाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची मागणी नाशिकच्या एकत्रित प्रस्तावात समाविष्ट करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या.

या बैठकीला महसूल, जिल्हा परिषद, साईबाबा संस्थान, शिर्डी नगरपरिषद, पोलीस, सार्वजनिक बांधकाम, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, शिर्डी विमानतळ, रेल्वे, एस.टी.महामंडळ व महावितरण या विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

#KumbhMela2026 #ShirdiDevelopment #NashikKumbhMela #ShirdiAirport #SaiBabaTemple #PravinGedam #KumbhMelaPreparations #MaharashtraTourism #ShirdiNews #PublicFacilities #InfrastructureUpdate #KumbhMelaAdministration #SpiritualJourney #Kumbh2026 #ShirdiUpdate

Share

Other News

ताज्या बातम्या