कोल्हापूर
कोल्हापूर शहरात लिशा हॉटेल ते कदमवाडी रस्त्यावर एका हॉस्पिटल च्या संरक्षक भिंतीलगत रस्त्यावर कोरोना काळात वापरण्यात येणारी पी पी ई कीट आढळून आली आहेत. गेले चार दिवस रस्त्याकडेला ही पी पी ई कीट पडून होती. गेल्या चार दिवसात याकडे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होते. स्थानिक नागरिक आणि पत्रकारांनी ही गंभीर बाब लक्षात आणून दिल्याने महापालिका आरोग्य विभाग आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या यंत्रणेची पळापळ झाली. अखेर महापालिका आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ही पी पी ई किट्स ताब्यात घेऊन त्याची शास्तरोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली.,
गेले चार दिवस लिशा हॉटेल ते कदमवाडी रस्त्यावर बेवारस अवस्थेत ही पी पी ई किट्स पडून होती. सामाजिक कार्यकर्ते हाजी अयुब मुल्ला यांनी पत्रकार नवाब शेख यांना याबाबत माहिती दिली. पत्रकार नवाब शेख, जावेद देवडी, रहीम पिंजारी आणि अपर्णा पाटील यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून त्वरित ही माहिती महापालिकेचे प्रभारी आरोग्याधिकारी डॉ एस एच पावरा
आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी प्रमोद माने यांना दिली. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी रोहिदास माठकर यांनी त्वरित धाव घेऊन पंचनामा केला. महापालिका आरोग्य विभागाचे स्वच्छता निरीक्षक सुशांत कांबळे यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन या पी पी ई किट्सची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावली.
दरम्यान ज्यांची मुख्य जबाबदारी होती, अशा आरोग्य महापालिकेचे मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार यांना याबाबत माहिती असून देखील आपला मोबाईल बंद ठेवून याकडे दुर्लक्ष केल्याने स्थानिक नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.