सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेने नागरिकांवर लादलेल्या अन्यायकारक वाढीव घरपट्टीच्या विरोधात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार वाढीव घरपट्टी विरोधी कृती समितीच्या बैठकीत करण्यात आला.
आज पंचमुखी मारुती रोड, खणभाग येथील ‘कष्टकऱ्यांची दौलत’ येथे वाढीव घरपट्टी विरोधी कृती समितीची व्यापक बैठक उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली. या बैठकीस विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, व्यापारी, व्यावसायिक तसेच सांगली, मिरज आणि कुपवाड शहरातील सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापालिका प्रशासन, सत्ताधारी पदाधिकारी आणि सन्माननीय नगरसेवक नागरिकांच्या वाढीव घरपट्टीच्या गंभीर प्रश्नावर साधा ‘ब्र’ शब्दही काढत नसल्याबद्दल बैठकीत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. नागरिकांच्या हरकती, तक्रारी आणि विविध त्रुटींची दखल न घेता हुकूमशाही पद्धतीने जबरदस्तीने वाढीव घरपट्टी लादण्याचा व फसव्या पद्धतीने ती वसूल करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करण्यात आला. या मनमानी कारभाराचा बैठकीत एकमुखाने निषेध करण्यात आला.
२० जुलै रोजी ‘बोंबाबोंब आंदोलन’
सोमवार, दिनांक २० जुलै २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता, महापालिकेची महासभा सुरू होण्यापूर्वी महानगरपालिका मुख्यालयासमोर नागरिकांच्या सहभागातून जोरदार ‘बोंबाबोंब आंदोलन’ करण्याचा निर्णय घेण्यात आला.
वाढीव घरपट्टीचा विषय महासभेत प्राधान्याने घेऊन त्यातील त्रुटी दूर होईपर्यंत नव्या वाढीव घरपट्टीची अंमलबजावणी आणि वसुली स्थगित करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात येणार आहे.
नागरिकांच्या तक्रारींसाठी गुगल फॉर्म
महापालिकेच्या वाढीव घरपट्टीसह पाणीपट्टी, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन, रस्ते, अतिक्रमण, बांधकाम परवानगी आणि इतर नागरी समस्यांबाबत नागरिकांच्या हरकती व तक्रारी एकत्रित करण्यासाठी स्वतंत्र गुगल फॉर्म तयार करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
या माध्यमातून नागरिकांच्या समस्या लेखी स्वरूपात संकलित करून त्या महापालिका प्रशासनासमोर पुराव्यानिशी मांडण्यात येणार आहेत.
पन्नास हजार माहितीपत्रकांचे वाटप
वाढीव घरपट्टीतील अन्याय, कायदेशीर त्रुटी, नागरिकांचे हक्क आणि हरकत नोंदविण्याची प्रक्रिया याबाबत जनजागृती करण्यासाठी सांगली, मिरज आणि कुपवाड शहरांमध्ये ५० हजार माहितीपत्रकांचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला.
प्रत्येक प्रभागात नागरिकांशी प्रत्यक्ष संपर्क साधून वाढीव घरपट्टीविरोधातील आंदोलन व्यापक आणि लोकाभिमुख करण्याचे ठरविण्यात आले.
४ ऑगस्टला शहर बंद व महापालिकेवर भव्य मोर्चा
महापालिका प्रशासनाने नागरिकांच्या मागण्यांची दखल घेतली नाही आणि अन्यायकारक वाढीव घरपट्टीला स्थगिती दिली नाही, तर मंगळवार, दिनांक ४ ऑगस्ट २०२६ रोजी सांगली, मिरज आणि कुपवाड शहर बंद ठेवून महानगरपालिका मुख्यालयावर हजारो नागरिकांचा भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.
हे आंदोलन कोणत्याही एका पक्षाचे किंवा संस्थेचे नसून सांगली, मिरज आणि कुपवाड शहरातील प्रत्येक करदात्या नागरिकाच्या न्याय्य हक्काचे आंदोलन आहे. त्यामुळे व्यापारी, उद्योजक, कामगार, ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक, सामाजिक संस्था आणि सर्व राजकीय पक्षांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन वाढीव घरपट्टी विरोधी कृती समितीच्या वतीने करण्यात आले.
बैठकीस उपस्थित मान्यवर
यावेळी सतीश साखळकर, हनमंत पवार, पद्माकर जगदाळे, समीर शहा, तानाजी सावंत, विष्णू बर्वे, माजी नगरसेवक मुन्नाभाई कुरणे, रवींद्र वळवडे, ॲड. अजित सूर्यवंशी, बाळासाहेब मासुरे सर, गजानन मिरजे, माजी नगरसेवक विनायक सिंहासने, विकास मगदूम, डॉ. संजय पाटील, नहीम शेख, नितीन चव्हाण, डॉ. ज्ञानचंद्र पाटील, रेवती हातकणंगलेकर, किरण कांबळे, सुरेश दुधगावकर, मोहन जगताप, नितीन मिरजकर, सुरेश टेंगले, आर्किटेक्ट प्रवीण माळी, प्रसन्न कुलकर्णी, ओंकार माने, चंद्रकांत सूर्यवंशी, अविनाश जाधव, जयपाल चौगुले, सुलतान तांबोळी, संजीव कुलकर्णी आणि प्रा. एस. के. पाटील सर यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाढीव घरपट्टी विरोधी कृती समिती
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर