नांदेड : परिवहन विभागामार्फत वाहन परवाना (लायसन्स) व वाहन नोंदणीसंबंधी सेवा अधिक पारदर्शक, सुलभ आणि कालबद्ध पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी ‘सारथी 4.0’ आणि ‘वाहन 4.0’ या ऑनलाइन संगणकीय प्रणाली कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. या प्रणालीद्वारे नागरिकांना घरबसल्या विविध सेवांसाठी अर्ज करता येत असून, त्यापैकी 58 सेवा फेसलेस पद्धतीने उपलब्ध असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांतराव साळी यांनी दिली आहे.
पूर्वी वाहन व अनुज्ञप्ती संदर्भातील अर्ज प्रत्यक्ष कार्यालयात येऊन सादर करावे लागत होते. त्यामुळे काही वेळा अनधिकृत व्यक्ती किंवा मध्यस्थांकडून नागरिकांची फसवणूक होण्याची शक्यता होती. मात्र, केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार विकसित करण्यात आलेल्या ऑनलाइन प्रणालीमुळे नागरिकांना आधार क्रमांक व त्यास संलग्न मोबाईल क्रमांकाच्या आधारे कार्यालयात न जाता घरबसल्या अर्ज करता येत आहेत. कार्यालयामार्फत अर्जांची ऑनलाइन पडताळणी करून मंजुरी अथवा नामंजुरीची कार्यवाही नियमितपणे केली जाते.
परिवहन विभागाच्या एकूण 115 अधिसूचित सेवांपैकी 89 सेवा ऑनलाइन उपलब्ध असून, अनुज्ञप्तीसंदर्भातील सेवा सारथी पोर्टलवर, तर वाहनसंबंधी सेवा वाहन पोर्टलवर दिल्या जातात. यापैकी 58 सेवा पूर्णपणे फेसलेस स्वरूपात उपलब्ध आहेत.
नागरिकांनी ऑनलाइन अर्ज करताना पोर्टलवर नमूद केलेले शासकीय शुल्क व कर इतकीच रक्कम ऑनलाइन भरावी. कोणत्याही अनधिकृत व्यक्ती किंवा मध्यस्थाला अतिरिक्त शुल्क देऊ नये. अतिरिक्त रकमेची मागणी होत असल्यास तत्काळ प्रादेशिक परिवहन कार्यालय, नांदेड येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, प्रादेशिक परिवहन कार्यालय, नांदेड येथे अनधिकृत व्यक्तींच्या प्रवेशास प्रतिबंध करण्यात आला असून, नागरिकांच्या वाहन व अनुज्ञप्तीसंबंधी अडचणी सोडविण्यासाठी माहिती व मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे. नागरिकांनी उपलब्ध 58 फेसलेस सेवांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.