जिल्हा परिषदेत कृषी दिन उत्साहात साजरा;पिक स्पर्धा विजेते शेतकऱ्यांचा सन्मान

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 02/07/2026 3:15 PM

नांदेड :- शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेती अधिक उत्पादनक्षम करावी. तसेच शेतीला पशुपालन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्यव्यवसाय यांसारख्या जोड व्यवसायांची जोड देऊन आर्थिक प्रगती साधावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी केले. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषदेमार्फत विविध कृषी व पूरक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

कृषी विभाग, आत्मा, जिल्हा परिषद कृषी विभाग आणि पंचायत समिती, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आज जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात कै. वसंतराव नाईक जयंती व कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी  जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या पूनम पवार, पोखरणी येथील कृषी विज्ञान केंद्राचे, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख, कापूस संशोधन केंद्राचे डॉ. अरविंद पंडागळे, कृषी विज्ञान केंद्र, सगरोळीच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. माधुरी रेवणकर, डॉ. शिवाजी शिंदे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रवीणकुमार घुले, जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ. नीलकुमार ऐतवडे, उपविभागीय कृषी अधिकारी सुप्रिया वायवळ, आत्माचे उपविभागीय कृषी अधिकारी गुंजकर आदी मान्यवर उपस्थित होते.

केंद्र शासनाच्या खेती बचाओ - धरती बचाओ अभियानांतर्गत जिल्हाभर जनजागृती सुरू असून शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर टप्प्याटप्प्याने कमी करून सेंद्रिय शेतीचा स्वीकार करावा, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र, पोखरणीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख यांनी केले. व्यापक जनजागृतीमुळे जिल्ह्यात अद्याप सुमारे ९५ टक्के शेतकऱ्यांनी पेरणी केलेली नसल्याने दुबार पेरणीचे संकट कमी राहण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. कृषी विज्ञान केंद्रात माती व पाणी परीक्षणाची सुविधा उपलब्ध असून अडचणीच्या वेळी शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क साधावा, असेही त्यांनी आवाहन केले.

*शेतकऱ्यांनी घरच्या बियांणाचा वापर करावा- कळसाईत*

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, शेतकऱ्यांनी घरच्या बियाणांचा वापर करावा. जमिनीतील ओलाव्याचा अंदाज घेऊनच पेरणी करावी. मागील वर्षी  शेतकऱ्यांना सुमारे नऊशे कोटी रुपयांच्या पीक विम्याचा लाभ मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. यावर्षी हळद पिकाचाही पीक विमा योजनेत समावेश करण्यात असून, पीक विमा भरण्याची अंतिम मुदत १४ जुलै असल्याचेही त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांपर्यंत कृषीविषयक माहिती पोहोचविण्यासाठी गावनिहाय व्हॉट्सॲप गट तयार करण्यात आले असून या गटांवर उपलब्ध होणाऱ्या माहितीचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. पाणी फाउंडेशनच्या फार्मर कप स्पर्धेअंतर्गत जिल्ह्यात 900 शेतकरी गटांची स्थापना करण्यात आली असून पुढील काळात प्रत्येक गावात शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. 
    
कपाशीचे उत्पादन वाढविण्यासाठी 3 बाय 1.5 फूट अंतरावर लागवड करून रोपांची संख्या वाढविण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. जिल्ह्यात सुमारे 5 लाख 100 हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड होत असल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ. नीलकुमार ऐतवडे यांनी जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कृषी योजनांची सविस्तर माहिती दिली. तसेच संभाव्य एल निनोच्या सावटाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी घ्यावयाची खबरदारी, पीक नियोजन आणि पाणी व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन करत त्यांनी स्वतः रचलेली जनजागृतीपर कविता सादर केली. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या सादरीकरणाला उपस्थित शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी डॉ. शिवाजी शिंदे, डॉ. अरविंद पंडागळे आणि डॉ. माधुरी रेवणकर यांनीही शेतकऱ्यांना आधुनिक शेती, पीक व्यवस्थापन आणि शाश्वत शेतीविषयी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ. नीलकुमार ऐतवडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रगतिशील शेतकरी तसेच बिरसा मुंडा कृषी स्वावलंबन योजना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतील लाभार्थ्यांचा वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला.

*पिक स्पर्धा विजेते शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आलेल्याची नावे*

कृषी दिनाच्या कार्यक्रमात सन 2025 च्या खरीप हंगाम पिकस्पर्धा विजेते शेतकऱ्यांचा केला सन्मान करण्यात आला. यात सोयाबीन या पिकासाठी जिल्हास्तर सर्वसाधारण गटासाठी शेख अजीम शेख खाजामोईद्दीन रा. निचपूर ता. किनवट, पीराजी बाबाराव आरसुळे रा. एकदरा ता. नांदेड, ज्ञानेश्वर पुर्भाजी आढाव रा. हद्दीदापूर ता. नांदेड यांना प्रत्येकी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक आहे. तर आदिवासी गटात माहूर तालुक्यातील गोंडवडसा येथील युवराज प्रकाश तोडसाम यांचा प्रथम क्रमांक आहे. मुग या पिकासाठी लोहा तालुक्यातील दापसेड येथील गोविंद मारोती होळगे तर उडीद या पिकासाठी विश्वनाथ गोविंदराव होळगे यांचा प्रथम क्रमांक आहे. मका पिकासाठी बाबय्या संतोबा कोरडेवाड रा. किनी ता. भोकर यांचा प्रथम, प्रणीतरेड्डी नरसिंहरेड्डी मूल्यलवाड यांचा द्वितीय क्रमांक आहे. तूर या पिकासाठी धर्माबाद तालुक्यातील बन्नाळी येथील दिगबंर शंकर कपाटे यांचा प्रथम तर हणमंतराव मारोती वारले यांचा द्वितीय क्रमांक आहे. या सर्व शेतकऱ्यांच्या आज मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. 

Share

Other News

ताज्या बातम्या