नांदेड :- रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी राबविण्यात येत असलेल्या “ऑपरेशन यात्री सुरक्षा” अंतर्गत रेल्वे सुरक्षा बल (RPF) नांदेडच्या गुन्हे गुप्तवार्ता शाखा (CIB) व सरकारी रेल्वे पोलीस (GRP) छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त पथकाने तीन संशयित चोरट्यांना ताब्यात घेण्यात यश मिळविले.
दि. १७ जून २०२६ रोजी सुमारे १४:२५ वाजता, छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर, गाडी क्रमांक १२७८८ नागरसोल–नांदेड एक्सप्रेसच्या थांब्यादरम्यान संयुक्त पथक गस्त घालत असताना तीन इसम संशयास्पद हालचाली करताना आढळून आले. हे इसम प्रवाशांच्या सामानाची चोरी करण्याच्या उद्देशाने संधीची वाट पाहत असल्याचे निदर्शनास आले.
ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे पुढीलप्रमाणे आहेत :
1. मकसूद सलीम
2. जुम्मन साहा
3. मक्सुद साहा
हे तिघेही जळगाव जिल्हा, महाराष्ट्र येथील रहिवासी आहेत.
चौकशीदरम्यान संबंधित व्यक्तींना रेल्वे स्थानकावर उपस्थित राहण्याबाबत कोणतेही समाधानकारक कारण सांगता आले नाही. त्यांच्या संशयास्पद वर्तनामुळे त्यांना ताब्यात घेऊन सरकारी रेल्वे पोलीस, छत्रपती संभाजीनगर यांच्या स्वाधीन करण्यात आले.
सरकारी रेल्वे पोलिसांनी गुन्हा क्र. ४१/२०२६ अन्वये महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ११२ व ११७ अंतर्गत दिनांक १७ जून २०२६ रोजी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे सुरक्षा बल व सरकारी रेल्वे पोलीस यांच्याकडून राबविण्यात येत असलेल्या “ऑपरेशन यात्री सुरक्षा” मोहिमेअंतर्गत ही उल्लेखनीय कारवाई करण्यात आली असून, रेल्वे परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तींवर प्रभावी नियंत्रण ठेवण्याच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे.