सांगली : रुग्णालयातील ऑपरेशन थिएटर म्हणजे सहसा तणाव, चिंता आणि उपचारांचे वातावरण. मात्र लोकनायक शिक्षण मंडळ सांगली संचलित श्रीमती शालिनी रंगनाथ दांडेकर हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज यशवंतनगर हायस्कूलच्या एका १४ वर्षीय मुलाने आपल्या दमदार आवाजातील शिवचरित्राच्या पोवाड्याने ऑपरेशन थिएटरमधील वातावरणच बदलून टाकले. या अनोख्या प्रसंगाने उपस्थित डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या मनावर अविस्मरणीय ठसा उमटवला.
मोतिबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी आलेल्या या मुलाशी शस्त्रक्रियेदरम्यान त्याचे मन दुसरीकडे वळावे म्हणून नेत्रतज्ज्ञ डॉ. तानाजी वाघमोडे संवाद साधत होते. गप्पांच्या ओघात हा मुलगा शाहीर असल्याचे समोर आले. शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर त्याने ऑपरेशन थिएटरमध्येच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे वर्णन करणारा पोवाडा सादर केला.
मुलाच्या ओजस्वी आवाजात आणि जोशपूर्ण सादरीकरणातून शिवरायांविषयीची निष्ठा, इतिहासाविषयीचे प्रेम आणि संस्कारांची ताकद स्पष्टपणे जाणवत होती. त्याचा पोवाडा ऐकताना उपस्थितांच्या अंगावर अक्षरशः काटा आला. काही क्षणांसाठी ऑपरेशन थिएटर हे जणू शिवचरित्राच्या प्रेरणादायी गजराने दुमदुमून गेले होते.
या प्रसंगानंतर उपस्थितांनी त्या मुलाच्या आई-वडिलांचे आणि प्रेरणा देणाऱ्या विद्यालयाचे विशेष कौतुक केले. आधुनिक काळात मुलांना केवळ शिक्षणच नव्हे, तर इतिहास, संस्कार, राष्ट्रप्रेम आणि स्वाभिमानाची शिकवण देणे किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव या घटनेतून झाली.
शेकडो वर्षांनंतरही छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि प्रेरणा आजच्या पिढीच्या रक्तात जिवंत असल्याचे या प्रसंगातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले. उपस्थितांनी या चिमुकल्या शाहीराचे कौतुक करत त्याच्या उज्ज्वल भवितव्यास शुभेच्छा दिल्या.