नांदेड :- सध्याच्या हवामानातील अनिश्चितता व यावर्षी एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे पावसाचे असमान वितरण, खंडित पाऊस अथवा दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी जोखीम कमी करण्यासाठी व उत्पादनाची शाश्वती वाढविण्यासाठी सोयाबीन + तूर आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.
आंतरपीक पद्धती ही हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर एक प्रभावी जोखीम व्यवस्थापन तंत्र आहे. सोयाबीन व तूर या पिकांची वाढ, अन्नद्रव्यांची गरज व कालावधी वेगवेगळा असल्याने दोन्ही पिके एकत्र घेतल्यास उपलब्ध पाणी, सूर्यप्रकाश व जमिनीतील अन्नद्रव्यांचा अधिक कार्यक्षम वापर होतो.
नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, पावसातील खंड किंवा इतर प्रतिकूल हवामानामुळे एका पिकाचे नुकसान झाल्यास दुसऱ्या पिकापासून उत्पादन मिळण्याची शक्यता राहते. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान कमी होऊन त्यांच्या हातात काही ना काही उत्पादन निश्चितपणे येण्यास मदत होते. ही पद्धत शेती व्यवसाय अधिक सुरक्षित व शाश्वत बनविण्यास उपयुक्त ठरते.
सोयाबीन व तूर आंतरपीक पद्धतीमध्ये शिफारशीनुसार ४:२ किंवा ६:२ ओळींचे प्रमाण ठेवावे. तसेच सुधारित वाणांची निवड, संतुलित खत व्यवस्थापन, वेळेवर तण नियंत्रण व एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करावा.
हवामानातील अनिश्चितता लक्षात घेऊन पीक विविधीकरणास प्राधान्य द्यावे व सोयाबीन + तूर आंतरपीक पद्धतीचा अवलंब करून उत्पादन व उत्पन्नाची शाश्वती वाढवावी, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.