नांदेड :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड लिंकेंजेस (IIL) सेलच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या ‘डेनिका लॅब टेक सोल्यूशन्स LLP’ या तंत्रज्ञानाधारित स्टार्टअप कंपनीला भारत सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयांतर्गत डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड (DPIIT) कडून अधिकृत स्टार्टअप म्हणून मान्यता प्राप्त झाली आहे. तसेच कंपनीने आंतरराष्ट्रीय मानकीकरण संस्था (ISO) च्या मानकांनुसार आवश्यक प्रमाणनही मिळविले असून विद्यापीठाच्या नवोपक्रम आणि उद्योजकता क्षेत्रातील हा एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.
विद्यापीठाच्या IIL सेलतर्फे आयोजित “Hackathon: Bridging Science, Technology and Business for Start-up” या उपक्रमांतर्गत प्राप्त झालेल्या स्टार्टअप प्रकल्प अनुदानाच्या माध्यमातून या कंपनीची स्थापना करण्यात आली. आंतरराष्ट्रीय मानांकिकरण संस्थेकडून (ISO) सुद्धा मानांकन प्राप्त झाले आहे. स्कूल ऑफ फिजिकल सायन्सेसचे विद्यार्थी श्री. नीरज आर. कोयलवार व श्री. सुशील जी. जैस्वाल, तसेच स्कूल ऑफ कॉम्प्युटेशनल सायन्सेसच्या माजी विद्यार्थिनी डॉ. दीपा के. बोगले यांनी स्कूल ऑफ फिजिकल सायन्सेसचे प्राध्यापक डॉ. काशिनाथ ए. बोगले यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्तपणे ही कंपनी स्थापन केली आहे.
‘डेनिका लॅब टेक सोल्यूशन्स LLP’ ही कंपनी वायू, रासायनिक आणि प्रकाशीय संवेदन (Gas, Chemical and Optical Sensing) तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अत्याधुनिक नवकल्पना विकसित करीत आहे. औद्योगिक क्षेत्रातील गुंतागुंतीच्या समस्यांवर प्रभावी उपाय उपलब्ध करून देण्यासाठी बुद्धिमान सेन्सर प्रणालींचे डिझाइन, निर्मिती, एकत्रीकरण आणि प्रत्यक्ष वापर यामध्ये कंपनी विशेष कार्यरत आहे. रिअल-टाइम मॉनिटरिंग, अचूक शोध, स्वयंचलित नियंत्रण तसेच उद्योगांच्या गरजांनुसार किफायतशीर आणि विश्वासार्ह तांत्रिक उपाय विकसित करण्यावर कंपनीचा भर आहे.
औद्योगिक कार्यक्षमता वाढविणे, सुरक्षा मानके अधिक सक्षम करणे तसेच पर्यावरणीय आणि गुणवत्ता निरीक्षण प्रणाली मजबूत करणे ही कंपनीची प्रमुख उद्दिष्टे आहेत. घरगुती व औद्योगिक वातावरणातील विषारी पदार्थांचे अचूक निदान आणि व्यवस्थापनासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करून आरोग्य, सुरक्षा आणि शाश्वत विकासासाठी योगदान देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.
या यशाबद्दल शुभेच्छा व्यक्त करताना विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. मनोहर चासकर म्हणाले की, विद्यापीठातील विद्यार्थी, संशोधक आणि प्राध्यापक यांच्या संयुक्त प्रयत्नांतून उद्योजकता आणि नवोपक्रमाला चालना मिळणे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. ‘डेनिका लॅब टेक सोल्यूशन्स LLP’सारख्या स्टार्टअप्समुळे विद्यापीठात विकसित होणारे संशोधन प्रत्यक्ष उद्योग आणि समाजाच्या उपयोगासाठी उपलब्ध होत आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यापीठाची स्टार्टअप परिसंस्था अधिक मजबूत होईल आणि विद्यार्थ्यांना रोजगार शोधणाऱ्यांऐवजी रोजगार निर्माण करणारे उद्योजक बनण्याची प्रेरणा मिळेल.
ते पुढे म्हणाले की, ही स्टार्टअप स्थापना विद्यापीठात राबविण्यात येत असलेल्या “एक स्कूल – एक स्टार्टअप” या अभिनव संकल्पनेच्या यशस्वी अंमलबजावणीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. या संकल्पनेतून निर्माण होणारे उपक्रम संशोधनाचे व्यावसायीकरण घडवून आणण्याबरोबरच आत्मनिर्भर भारत, नवोपक्रमाधारित अर्थव्यवस्था आणि शाश्वत विकासाच्या राष्ट्रीय उद्दिष्टांनाही बळकटी देतील.
या उल्लेखनीय यशाबद्दल कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड लिंकेंजेस सेलचे संचालक डॉ. शैलेश वाढेर, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. सुरेंद्रनाथ रेड्डी, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. माधव के. पाटील, स्कूल ऑफ फिजिकल सायन्सेसचे संचालक डॉ. राजाराम माने आणि डॉ. अरविंद सरोदे यांनी कंपनीच्या संस्थापक सदस्यांचे अभिनंदन केले.
विशेष म्हणजे, या उद्योग स्थापनेची प्रेरणा विद्यार्थ्यांना ‘आविष्कार’ संशोधन स्पर्धेतील सहभागातून मिळाली. या व्यासपीठामुळे त्यांना संशोधन सादर करण्याची, तज्ज्ञांशी संवाद साधण्याची आणि संशोधनाधारित नाविन्यपूर्ण कल्पनांचे उद्योजकीय उपक्रमात रूपांतर करण्याची संधी मिळाली. त्यातूनच या स्टार्टअपची संकल्पना आकारास आली आणि आज ती भारत सरकारकडून मान्यताप्राप्त स्टार्टअप कंपनी म्हणून यशस्वीपणे उदयास आली आहे.