‘जागतिक पर्यावरण दिना’चे औचित्य साधून सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका आणि विविध सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आज सांगली येथील **कृष्णा नदी सरकारी घाट व नदीपात्र स्वच्छता अभियान** अत्यंत उत्साहात आणि व्यापक पातळीवर राबविण्यात आले. सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी **मा. श्री. मैनाक घोष** आणि महापालिका आयुक्त **श्रीम. संजीता महापात्र** यांनी स्वतः या मोहिमेत सहभागी होऊन नदी संवर्धनाचा संदेश दिला.
कृष्णा नदीचे पावित्र्य राखणे आणि नदीपात्र प्रदूषणमुक्त करणे हा या विशेष मोहिमेचा मुख्य उद्देश होता.
महापालिकेच्या स्वच्छता दूतांनी, कर्मचाऱ्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष नदीपात्रात उतरून श्रमदान केले. या मोहिमेदरम्यान खालील बाबींवर विशेष भर देण्यात आला.
* नदीपात्रात साठलेला कचरा, प्लास्टिक पिशव्या आणि टाकाऊ वस्तू गोळा करण्यात आल्या.
* नागरिकांनी नदीत टाकलेले निर्माल्य, देव-देवतांचे फोटो आणि मूर्ती अत्यंत संवेदनशीलतेने नदीपात्रातून बाहेर काढून त्यांची सुरक्षित विल्हेवाट लावण्यासाठी संकलित करण्यात आल्या.
याप्रसंगी जिल्हाधिकारी मैनाक घोष व आयुक्त संजीता महापात्र यांनी समस्त सांगलीकर नागरिकांना नम्र आवाहन केले की, “कृष्णा नदी ही सांगलीची जीवनवाहिनी आहे. तिचे आरोग्य राखणे ही केवळ प्रशासनाचीच नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी आहे. नागरिकांनी नदीपात्रात किंवा घाटावर निर्माल्य, प्लास्टिक व इतर कोणताही कचरा टाकू नये. शहर आणि नदी स्वच्छ ठेवण्यासाठी महानगरपालिकेला सहकार्य करावे.”
या अभियानात ‘निर्धार फाउंडेशन’ व अन्य सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, विविध क्षेत्रांतील समाजसेवक आणि सजग नागरिक मोठ्या संख्येने स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते.
या मोहिमेचे नियोजन व अंमलबजावणी आरोग्य व स्वच्छता विभागाच्या उपायुक्त **श्रीम. स्मृती पाटील** यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. सचिन सागावकर,सहाय्यक आयुक्त विनायक शिंदे, स्वच्छता अधिकारी याकुब मद्रासी, अतुल आठवले यांच्यासह महापालिकेचे सर्व स्वच्छता निरीक्षक, मुकादम आणि स्वच्छता कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.