नांदेड :- डास व इतर कीटकांच्या माध्यमातून होणारे वेक्टरजन्य रोग तसेच वाढती प्रतिजैविक प्रतिरोधकता ही जागतिक सार्वजनिक आरोग्यासमोरील गंभीर आव्हाने असून त्यावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी नाविन्यपूर्ण संशोधन, अंतःविषयक दृष्टीकोन आणि सशक्त आंतरराष्ट्रीय सहकार्य अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ. मनोहर चासकर यांनी केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील अधिसभा सभागृहात दि.२६ फेब्रुवारी, २०२६ रोजी जैवशास्त्र संकुल आणि वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘जीवन विज्ञानातील नवकल्पना आणि उपयोजना: डास-कीटक माध्यमातून होणारे रोग आणि प्रतिजैविक प्रतिरोधकता’ या विषयावरील दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते अध्यक्षीय मनोगत व्यक्त करत होते.
यावेळी व्यासपीठावर आफ्रिका मधील चेईख अंता डोईप विद्यापीठ सेनेगल येथील प्रा. ई. आय. हाडजी नियांग, थायलंड येथील केसेरटसार्ट विद्यापीठाचे प्रा.स्थियाफाप चारेओन वीरियाफाप, ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ.अशोक गिरी, डॉ. एस. के. घोष, तसेच शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, प्रा. डॉ. टी. ए. कदम, डॉ. एस. पी. चव्हाण आणि परिषदेचे समन्वयक तथा जैवशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. बी. एस. सुरवसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे कुलगुरू म्हणाले की, अशा परिषदांमुळे ज्ञानाची देवाणघेवाण, संशोधनाचा प्रसार आणि प्रभावी धोरणात्मक उपाययोजनांची निर्मिती साध्य होते. वेक्टरजन्य रोगांचे वाढते संकट लक्षात घेता वैज्ञानिक, संशोधक व धोरणकर्त्यांनी एकत्रित प्रयत्न करणे काळाची गरज आहे.
दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत देश-विदेशातील अनेक मान्यवर मार्गदर्शन करणार असून डॉ. राकेश मिश्रा (बेंगलुरू), डॉ. फ्रान्सिस लोबो (युएसए), डॉ. साखई थीईल्या (बेंगलुरू), प्रा. क्रिकलेरु फोरनास (सिंगापूर), डॉ. जिकेश नारार्क (थायलंड), डॉ. प्रसाद फडके(पुणे), डॉ. हरीश फुलेरिया (मुंबई), डॉ. आशिष सुरवाणी(बेंगलुरू), डॉ. रीना टिळक (पुणे) आणि डॉ. श्रीकांत नेना (न्यू दिल्ली) यांचा समावेश आहे.
परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. एल. एच. कांबळे, डॉ. हेमलता पाटील, डॉ. एस. टी. हजारे, डॉ. सुरेश पठाडे, डॉ. प्रशांत वक्ते, डॉ. उमेश धुलधाज, डॉ. मिलिंद गायकवाड, डॉ. संजय चव्हाण, विद्या सुकारे, प्रतिभा ढवळे, प्राजक्ता चांडोळकर, रुबिया शेख, गोविंद सूर्यवंशी व समरीन पठाण यांनी परिश्रम घेत आहेत.
या परिषदेत देश-विदेशातील प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती असून वेक्टरजन्य रोगांवरील प्रभावी उपाययोजना शोधण्यासाठी ही परिषद महत्त्वपूर्ण ठरणार आहे.