अहिल्यानगर, दि. १८: जिल्ह्यात अवैध सावकारीमुळे शेतकरी, व्यावसायिक व सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा तातडीने निपटारा करावा. संबंधित प्रकरणांमध्ये नोटीस पोहोच झाल्याची खात्री करूनच गुणवत्तेवर निर्णय घ्यावेत. जिल्ह्यातील पीडित शेतकरी व नागरिकांनी भीती न बाळगता पुढे येऊन अवैध सावकारांविरोधात तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ अंतर्गत गठीत त्रिसदस्यीय समितीची बैठक नुकतीच संपन्न झाली, त्याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. आशिया बोलत होते. बैठकीस जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मंगेश सुरवसे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले , गरजू नागरिक, व्यावसायिक व शेतकऱ्यांनी अवैध सावकारांकडून कर्ज घेऊ नये. सहकार विभागाकडून परवाना प्राप्त सावकारांकडूनच कर्ज घ्यावे, जेणेकरून अवैध सावकारीला पायबंद बसेल. अवैध सावकारांकडून जादा व्याज आकारून त्रास दिला जात असल्यास सहकार विभागाकडे तक्रार दाखल करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
जिल्ह्यात अवैध सावकारी करणाऱ्या २१ सावकारांविरोधात संबंधित तालुका पोलीस ठाण्यात महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियमान्वये २० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच, आतापर्यंत १९ अपील प्रकरणांमध्ये २५ हेक्टर १५.५ आर जमीन व २ हजार २०० चौ.फुट बांधकाम विविध शेतकऱ्यांना परत मिळवून देण्याबाबत आदेश पारित करण्यात आले आहेत.
शासनाने परवानाधारक सावकारांसाठी व्याजदर निश्चित केले असून, शेतकऱ्यांना तारण कर्जासाठी ९ टक्के व विनातारण कर्जासाठी १२ टक्के; तर बिगरशेतकऱ्यांना तारण कर्जासाठी १५ टक्के व विनातारण कर्जासाठी १८ टक्के व्याजदर लागू असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मंगेश सुरवसे यांनी दिली. #Ahilyanagar #FarmerSupport #ActionAgainstCrime #DistrictCollector #PankajAshiya #ConsumerProtection #MaharashtraSahakar #अहिल्यानगर #अवैधसावकारी #शेतकरीहित #प्रशासन #सहकारविभाग